Team MyPuneCity – राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा हवामानात बदल होत असून, हवामान विभागाने गुरुवारी (२३ मे २०२५) सकाळी विजांचा कडकडाट, वाऱ्याच्या झोतासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा (Weather Alert) दिला आहे.
पुढील ३ ते ४ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, रायगड, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहिल्याबाई नगर या जिल्ह्यांतील काही ठिकाणी वादळी वारे (३०-४० किमी प्रतितास वेगाने) वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलक्याशा पावसाची (Weather Alert) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यात काही भागांत पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यातही काही भागांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची नोंद झाली. यामध्ये भोर तालुक्यात सर्वाधिक ४९ मिमी पावसाची नोंद झाली असून, गिरीवन (२८ मिमी), बारामती (२१.५ मिमी), एनडीए (१७.५ मिमी), ढमढेरे (१४ मिमी), पाषाण (१३.५ मिमी), चिंचवड (१२ मिमी), हवेली (११.५ मिमी), शिवाजीनगर (१०.५ मिमी), हडपसर (१० मिमी), वडगावशेरी (१० मिमी), लवासा (८ मिमी), कोरेगाव पार्क (७.५ मिमी), तळेगाव (७ मिमी), बल्लाळवाडी (६.५ मिमी), राजगुरूनगर (६ मिमी), नारायणगाव (६ मिमी), डुडूळगाव (५ मिमी), निमगिरी (५ मिमी), मगरपट्टा (३ मिमी), लोणावळा (३ मिमी), पुरंदर (०.५ मिमी), माळीण (०.५ मिमी), दापोडी (०.५ मिमी), दौंड (०.५ मिमी) या भागांमध्ये पावसाची नोंद झाली आहे.
काय घ्याल काळजी?
- विजांच्या कडकडाटाच्या वेळी (Weather Alert) उघड्यावर राहू नका.
- झाडाखाली, उंच बांधकामाजवळ किंवा विजेच्या तारांच्या खाली थांबू नका.
- शक्य असल्यास घरातच राहा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा.
- शेतकरी व जनावरे ठेवणारे नागरिक यांच्यासाठी विशेष सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामानातील हे बदल आगामी मान्सूनच्या पूर्वलक्षणांपैकी एक मानले जात असून, हवामान खात्याकडून नियमितपणे माहिती घेऊन योग्य ती खबरदारी (Weather Alert) घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.