Team MyPuneCity – शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश घारे यांच्या मोटारीवर झालेल्या गोळीबार प्रकरणात (Warje Firing Case) तपासाला नाट्यमय वळण मिळाले असून, हा प्रकार खरा नसून बनाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी नीलेश घारे यांच्याच ओळखीतील तीन तरुणांना अटक केली आहे.
गोळीबार प्रकरणात (Warje Firing Case) अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय ऊर्फ बगली सकपाळ अशी आहेत. हे तिघेही नीलेश घारे यांचे जवळचे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नीलेश घारे यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे भासवून पोलीस संरक्षण मिळवण्यासाठीच हा बनाव रचल्याचा संशय आहे.
हा प्रकार १९ मे रोजी रात्री अकरा वाजता घडला. नीलेश घारे हे वारजे येथील गणपती माथा परिसरातील आपल्या कार्यालयात असताना, दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी घारे यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारवर गोळीबार केला. या घटनेत कारच्या काचेला एक गोळी लागली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार (Warje Firing Case) करणारे दोघे दुचाकीवरून जाताना स्पष्टपणे दिसून आले होते.
या घटनेच्या काही तासांपूर्वीच, १९ मे रोजी दुपारी व्यंकटेश ऊर्फ विकी शिवशंकर अनपुर याने घारे यांना फोन करून धमकी दिली होती. ‘‘तुला बघून घेतो, तुझा बॉडीगार्ड तुला वाचवू शकणार नाही,’’ असे म्हणत त्याने घारे यांना धमकावले होते. त्यामुळे, सुरुवातीला ही घटना विकी अनपुर याने घडवून आणली असावी, असा संशय नीलेश घारे यांनी पोलिसांत तक्रार देताना व्यक्त केला होता.
मात्र, तपास पुढे जात असताना पोलिसांनी जेव्हा तांत्रिक पुरावे आणि तिघा संशयितांची चौकशी केली, तेव्हा संपूर्ण प्रकारात घारे यांच्याच संमतीने हा प्रकार (Warje Firing Case) घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी हा तपास अधिक खोलात नेला असून, प्रत्यक्षात कोणाची जबाबदारी आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आणखी काही जणांची चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास वारजे पोलीस करीत असून, बनावट गोळीबाराचा बनाव सिद्ध झाल्यास संबंधितांवर फसवणूक आणि दिशाभूल केल्याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.