Team My Pune City – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर सरकारने रद्द केला आहे. त्यानंतर आता 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहेत. या विजयी मेळाव्याची अधिकृत निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.मुंबई येथील वरळीतील प्रसिद्ध डोम सभागृहात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित ऐतिहासिक मेळावा पार पडणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.त्याच्या निमंत्रण पत्रिकेत ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे’ असे नमूद करण्यात आले आहे, ज्यामुळे दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्याची सुरुवात 5 जुलैला सकाळी 10 वाजता होणार आहे. आज शिवसेनेचं मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून विजयी मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांनी एकत्र पत्र काढत विजयी मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ जाहीर केली आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी, सकाळी 10 वाजता ठाकरे बंधू संपूर्ण महाराष्ट्राला-देशाला एकत्र पाहायला मिळणार आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कडुन एक पत्रक काढत मराठी जनतेला उद्देशून भावनिक आवाहन करण्यात आले आहे. “आवाज मराठीचा!” असे शीर्षक आहे. “मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं!” .आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या…आम्ही वाट बघतोय…, असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावंही देण्यात आले आहे.
निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय?
या मेळाव्यातून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. हिंदी सक्तीच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यानंतर भविष्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.