Team MyPuneCity –महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हगवणे आई आणि मुलाच्या विरोधात दाखल असलेल्या जेसीबी फसवणूक प्रकरणात पोलिसांनी चौथ्या रिकव्हरी एजंटला अटक केली आहे. या एजंटने जेसीबी मशीन ताब्यात घेऊन शशांक हगवणे याला सोपविण्याची ३० हजार रुपयांची मांडवली केली असल्याचे समोर आले आहे.
प्रणय तुकाराम साठे (२७, कोथरूड) असे अटक केलेल्या चौथ्या रिकव्हरी एजंटचे नाव आहे. यापूर्वी योगेश रासकर (२५), वैभव मोहन पिंगळे (२७, तळेगाव ढमढेरे) आणि गणेश रमेश पोतले (३०, मोहितेवाडी) या तीन रिकव्हरी एजंटना अटक करण्यात आली आहे.
Chinchwad: “पर्यावरण दिनी ‘एक झाड एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”
वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणातील आरोपी पती शशांक राजेंद्र हगवणे आणि सासू लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) या माय-लेका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. बँकेने जेसीबी मशीन जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतरही जेसीबी जप्त करून शशांक हगवणे याच्या ताब्यात देणार्या तिघा रिकव्हरी एजंटांना महाळूंगे एमआयडीसी पोलीसांनी ५ जून रोजी अटक केली.
या एजंटकडे तपास करताना आणखी एका रिकव्हरी एजंटचे नाव समोर आले. शशांकचा मित्र रिकव्हरी एजंट प्रणय साठे याने इतर तीन रिकव्हरी एजंट आणि शशांक यांच्यात मध्यस्थी केली. या मांडवलीसाठी प्रणय याने शशांक याच्याकडून ३० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले. ती रक्कम त्याने गणेश पोतले याला दिली. त्यामुळे पोलिसांनी प्रणय याला शुक्रवारी (६ जून) अटक केली आहे.