Team MyPuneCity – निगोजे (ता. खेड) येथील रहिवासी प्रशांत येळवंडे यांच्याशी झालेल्या जेसीबी खरेदी व्यवहारात लता व शशांक हगवणे या दोघांनी आर्थिक फसवणूक केली असून, पैसे परत मागितल्यावर(Vaishnavi Hagawane Case) पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रशांत येळवंडे यांनी मार्च २०२२ मध्ये लता व शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांचा जेसीबी विकत घेण्याचा व्यवहार केला होता. व्यवहाराच्या वेळी त्यांनी पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. मात्र सदर मशीनवर इंडसइंड बँकेचे १९ लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्याअनुसार, दर महिन्याला ५०,००० रुपयांचे हप्ते भरावेत असे ठरले आणि एकूण ६.७० लाख रुपये लता हगवणे यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. मात्र त्यांनी हे पैसे बँकेकडे हप्ते भरण्यासाठी वापरले नाहीत आणि ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. हप्ते न भरल्यामुळे बँकेने ऑगस्ट २०२४ मध्ये सदर जेसीबी जप्त केली. त्यानंतर हगवणे यांनी ती जेसीबी बँकेकडून सोडवून घेतली पण ती पुन्हा येळवंडे यांच्याकडे सुपूर्द केली नाही. याबाबत आता गुन्हा दाखल होणार असून यामुळे हगवणे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ होणार (Vaishnavi Hagawane Case) आहे.