Team MyPuneCity – मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने मावळ तालुक्याला झोडपून काढले असून खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसलेली आहे. शेतकऱ्यांसमोर भात रोपे कशी तयार करायची याबाबत चिंता लागून राहिली आहे.
गेली आठ-दहा दिवस अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात रोजच हजेरी लावत आहे.एकूणच रोजच पाऊस पडत असल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाचे नियोजन बिघडलेले आहे. खरीप भाताच्या रोपाची तयारी करण्याअगोदरच पावसाने हजेरी लावल्याने रोपटी तयार करणे शेतकऱ्यांना जमले नाही.
आता अवकाळी पावसाचा दररोज जोर वाढतो आहे. हवामान खाते मान्सूनचे लवकर आगमन होईल असा अंदाज देत आहेत. त्यामुळे खरीप भात पिकाचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी राजा आहे.
Dehugaon: देहूत देशी वृक्षांचे वृक्षारोपण
गेली आठ-दहा दिवस पाऊस पडल्यामुळे उन्हाळी भुईमूग,बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाता- तोंडाशी बाजरीचे पीक आले असताना देखील काढता येत नाही.त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागत आहे. तसेच भुईमूग पीकाला पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे काढता येत नाही. काही ठिकाणी शेंगांना मोड येऊ लागले आहेत.
गेल्या आठ-दहा दिवस पाऊस मोठ्या प्रमाणावर बरसल्याने आंबा, जांभूळ आणि करवंदे या रानमेव्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आंबे झाडावरच तयार झालेले असताना पावसामुळे ते काढता येत नाही.अवकाळी पाऊस लवकर आल्याने आंब्याचा दर घसरला आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात, बांधावर फळबाग लागवड केल्याने दरवर्षीच्या तुलनेत आंब्याच्या दरात यावर्षी घट झालेली दिसून येत आहे.