Team MyPuneCity – लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूने गंभीर दुखापती झाल्याने वडगाव मावळ पोलिसांकडे एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, एकूण १३ हून अधिक व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात आले ( Vadgaon Maval Crime News) आहेत.
ही घटना २ जून २०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास ठाकरवाडी, मौजे भोयरे, ता. मावळ, जि. पुणे येथील लग्न समारंभाच्या ठिकाणी घडली. याआधी १ जूनच्या रात्री हळदीच्या कार्यक्रमात काही गटांमध्ये वाद झाल्याची पार्श्वभूमी होती.
पहिली तक्रार:
गणपत काळुराम जाधव (वय ४८, रा. सपकाळवाडी, आढले बु.) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी संभा वाघमारे, भीमा वाघमारे, संजय पवार, सोमनाथ वाघमारे, दत्ता वाघमारे, सुनील संतोष वाघमारे (सर्व रा. कल्हाट) आणि त्यांच्या ४-५ अज्ञात साथीदारांनी काठ्या व कोयत्यांसह लग्नस्थळी धाव घेत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर त्यांनी गणपत जाधव, त्यांची पत्नी कमल, मुलगा समीर, नातेवाईक सविता पवार, एकनाथ वाघमारे व भरत मोरे यांना मारहाण केली. या हल्ल्यात गणपत वाघमारे व एकनाथ वाघमारे गंभीर जखमी झाले.
दुसरी तक्रार:
या घटनेच्या दुसऱ्या बाजूने भीमा नागू वाघमारे (वय ५५, रा. कातकर वस्ती, कल्हाट) यांनी दिलेल्या फिर्यादीत, १ जून रोजी रात्री झालेल्या वादाचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी समीर गणपत वाघमारे, मंगेश वाघमारे, आकाश वाघमारे, प्रकाश वाघमारे, गणपत जाधव, एकनाथ वाघमारे (सर्व रा. आढले बु.), विजय पवार (रा. भोयरे) व त्यांचे ३-४ अज्ञात साथीदारांनी कोयते, काठ्या व दगडांच्या साहाय्याने भीमा वाघमारे, संजय पवार, सोमनाथ वाघमारे, दत्ता वाघमारे, सुनील वाघमारे, संभा वाघमारे यांना मारहाण करत जखमी ( Vadgaon Maval Crime News) केले.
या दोन्ही घटनांमुळे गावात तणावाचे वातावरण असून वडगाव मावळ पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध भारतीय दंड विधान, आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये काहींना ओळखण्यात आले असून उर्वरित अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत ( Vadgaon Maval Crime News) आहेत.