Team MyPuneCity – मंगळवारपासून अचानक आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात मोठा तडाखा दिला. तळेगाव, इंदोरी, नाणोली, सोमाटणे, नवलाख उंबरे, आंबी, वराळे, गोळेवाडी, वारंगवाडी, वडगाव कामशेत, शिरगाव, गहुंजे, बेबड ओहोळ, धामणे, गोडुंब्रे, साळुंब्रे, चांदखेड या गावांमध्ये आठ ते दहा तास जोरदार वारा आणि पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
उन्हाळी हंगामात पाण्याची सोय असलेल्या मावळातील अनेक शेतकरी बाजरी, भुईमूग आणि भाजीपाला घेतात. सध्या बाजरी काढणीसाठी तयार असताना अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वाऱ्यांनी उभे पीक आडवे झाले. परिणामी, शेकडो शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावर लावलेली बाजरी या पावसामुळे प्रभावित झाली असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal Rain) फळझाडांनाही बसला आहे. विशेषतः आंबा आणि जांभूळ या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीस तयार असलेला आंबा जोरदार वाऱ्यामुळे झाडांवरून पडून गळून गेला. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या आठवड्याभरात मावळ परिसरात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन वारंवार होत असल्याने शेतीवर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.




















