सृजनसाधक पुरस्काराने रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचा गौरव
‘सृजनसभा’ संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
Team MyPuneCity – कलेच्या क्षेत्रात संस्कृतीमुळे अनेक परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत याकडे पुन्हा एकदा वळून बघण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी केले. विविध कलांच्या क्षेत्रातील सृजन विचार रसिकांपर्यंत (Pune) पोहोचण्यासाठी ‘सृजनसभा’ उत्तमप्रकारे कार्य करीत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शास्त्रोक्त संगीतासाठी समर्पित ‘सृजनसभा’ संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आणि सृजनसाधक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 22) सायंकाळी शिवाजीनगर येथील घोले रोडवरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सृजनसाधक पुरस्काराने स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या रागेश्री वैरागकर-कुलकर्णी (नाशिक) यांचा सन्मान पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कराचे स्वरूप होते. सृजनसभा प्रमुख होनराज मावळे, संस्थेच्या व्यवस्थापन प्रमुख अक्षदा इनामदार मंचावर होते.
Talegaon: नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये ‘जागतिक योग दिन’ साजरा
पंडित रघुनंदन पणशीकर म्हणाले, सृजनसभेच्या माध्यमातून संस्थाप्रमुख होनराज मावळे विविध कलांच्या क्षेत्रातील विचार रसिकांना उत्तम प्रकारे समजावून सांगत आहेत. कलेच्या क्षेत्रातील (Pune) संस्थेची वाटचाल दैदिप्यमान असेल.
संस्थेच्या वाटचालीविषयी अध्यक्षपदावरून बोलताना होनराज मावळे म्हणाले, सर्व क्षेत्रातील कलाकारांना एकत्र आणण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. सांगीतिक कार्यक्रमांची निर्मिती करून त्याचे प्रयोग महाराष्ट्रभर सादर करण्यात येत आहेत. संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्काराविषयीची माहिती अक्षदा इनामदार यांनी प्रास्ताविकात सांगितली.
निसर्ग लोहार यांनी साकारलेल्या सृजन गणेशाच्या प्रतिमेचे अनावरण तसेच दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. सन्मानपत्राचे वाचन राधा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणालिनी दुसाने यांनी तर आभार प्रदर्शन प्रांजल अक्कलकोटकर यांनी (Pune) केले.
रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचे बहारदार गायन
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रागेश्री वैरागकर-कुलकर्णी यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग पुरिया कल्याणमधील ‘हो वन लागी सांझ’ हा बडाख्याल तर ‘पिहरवा आजा रे’ हा छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर मिरामधुरा नाटकातील आनंदसुधा हे गीत सादर केले. संत नामदेव रचित, पंडित शंकरराव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेले ‘जननीये जीवलगे’ हे भक्तीगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता संत जनाबाई रचित आणि जगदेव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘पंढरीच्या राया’ या भैरवीने केली. त्यांना प्रसाद करंबेळकर (तबला), जगदेव वैरागकर (संवादिनी), ऋग्वेद जगताप (पखवाज), गार्गी काळे (टाळ), आर्या ऐगळीकर (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
भारतीय संस्कृती जपण्याचे काम होत असतानाच युवा कलाकारांना स्वरमंच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, असे रागेश्री वैरागकर-कुलकर्णी (Pune) म्हणाल्या.