Team MyPuneCity –खेड, आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजने मुख्याध्यापक संघाच्या(Shree Dnyaneshwar Vidyalaya) वतीने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत खेड तालुक्यात १००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांत 300 पैकी 278 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. यानिमित्ताने शाळेच्या यशात व विकासामध्ये चार चांद लागल्याचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले.
पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये एका स्वतंत्र पथकाद्वारे विविध निकशांतर्गत तपासणी केली जाते. सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील ‘शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी करण्यात आली. त्यात श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मासिक चाचणी, अप्रगत कार्यशाळा, जादा तास यामुळे दहावीचा निकाल शंभर टक्के. ‘ कलाकार घडताना’ अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम, विद्यार्थी घडताना अंतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते यांची व्याख्याने, स्कॉलरशिप, एन एम एम एस, विविध विषयांच्या प्रज्ञाशोध परीक्षा, टिळक महाराष्ट्र परीक्षा, एम टी एस, नवोदय, मंथन या परीक्षांमध्ये विद्यालयातील विद्यार्थी जिल्हा राज्य स्तरावर शिष्यवृत्ती प्राप्त झाले. वारकरी संप्रदायातील संपूर्ण महाराष्ट्रातील पखवाज, पेटी, कीर्तन, प्रवचन, गायन यासारख्या अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणारी शाळा, दिव्यांग विद्यार्थ्यांची सुविधा,विद्यालयामध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’, हरिपाठ पाठांतर, हरिपाठ अर्थ विवेचन असे नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशस्त व भव्य तीन मजली इमारत, कलादालन, क्रीडा दालन, गणित व विज्ञान प्रयोगशाळा, ई – लर्निंग, स्मार्ट बोर्ड सुविधा अशा अनेक निकष व उपक्रमांचे मूल्यांकन करण्यात आले.
याच अनुषंगाने श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने १००० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या गटात तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून या अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता गणेश क्रीडा रंगमंच स्वारगेट, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचे पत्र नुकतेच शाळेला प्राप्त झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी सांगितले. या निमित्ताने संस्थेचे सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक केले.