Team MyPuneCity – आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने मोठे संघटनात्मक बदल करत राज्यामध्ये नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्त्या केल्या. यामध्ये पिंपरी -चिंचवड शहराच्या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे आणि आमदार उमा खापरे या प्रस्थापितांच्या गटांना ‘ काटे की टक्कर’ देत शत्रुघ्न काटेंनी(Shatrughna Kate) शहराध्यक्षपद मिळविले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यासंदर्भात घोषणा केली.
Shekhar Singh: आयुक्त शेखर सिंह यांची निगडी लाईटहाऊस केंद्रास भेट
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न काटे इच्छुक होते. परंतू त्यांना उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या शत्रुघ्न काटेंनी पक्षातील इतर नाराजांना हाताशी धरून बंड पुकारले. अखेर पक्षश्रेष्ठीनी शत्रुघ्न काटे यांची समजूत काढून त्यांना शहर कार्यकारी अध्यक्ष पद सोपवले होते.
शत्रुघ्न काटे(Shatrughna Kate) हे महानगर पालिकेत तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच त्यांचे नाव महापौरपदासाठी आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी देखील चर्चेत होते. ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु विधानसभेच्या काळात उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आमदार शंकर जगताप यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, विलास मडिगिरी, अनुप मोरे, भीमा बोबडे, शैला मोळक, विद्यमान शहर कार्यकारी या नावांची शहराध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा होती. अखेर नाराज शत्रुघ्न काटे यांना हे पद देऊन पक्षाने आपला शब्द (Shatrughna Kate) पाळला.