Team My Pune City –राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोविंद बागेत पत्रकार परिषद (Sharad Pawar)घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यावर्षीची दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली अशी माहिती शरद पवार यांनी दिली. त्या सोबत त्यांनी राज्य सरकारने ज्या पद्धतीने मदत करायला पाहिजे, त्या पद्धतीने करत नाही, अशी खंत व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, दिवाळीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या सगळ्या सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेतला की, दिवाळी साजरी करायची नाही. कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी पूर तर काही ठिकाणी महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती उध्वस्त झाली. तिथल्या जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतकरी अस्वस्थ आहे आणि तो दिवाळी करण्याच्या मनस्थितीत नाही तर आपण का दिवाळी साजरी करायची असा निर्णय घेतला आहे.
Pune : मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या तरुणला वानवडी पोलिसांकडून अटक
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन वास्तूचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते; ७६१ कोटी १७ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ!
शरद पवार म्हणाले, आम्हाला यात राजकारण करायचे नाही. मात्र ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांनी या शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारने केलेली मदत तोकड्या स्वरूपाची असून, त्यामध्ये त्यांचं कुठलंही नुकसान भरून येऊ शकत नाही. शेतकऱ्याला त्याची जमीन हेच त्याचं सर्वस्व आहे. या महापुरात याचं सर्वस्व गेलं आहे. त्याच्या दुःखात आमच्या संघटनेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले , ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सत्ता आहे. त्यांची शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी असते. लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावायचा असतो. आजच्या राज्य सरकारने काही तोकडी रक्कम लोकांना जाहीर केली. मात्र नुकसानीचं स्वरूप बघितलं, तर या तोकड्या रकमेचा उपयोग त्याला शेतकऱ्याला उभं करण्यासाठी होईल असं वाटत नाही. त्यामुळे राज्य सरकारवर सुद्धा हा संकटग्रस्त शेतकरी नाराज आहे. मात्र या प्रश्नाकडे मी वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. मला राजकारण करायचं नाही. मात्र संकटग्रस्त लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. ती तयारी आम्ही राज्य सरकारला दाखवली पण मोकळ्या हाताने मदत करण्याची तयारी राज्य सरकारची दिसत नाही. त्यामुळे नाईलाजाने आजची दिवाळी नाही.