Team MyPuneCity –समाजात विशेषतः महिलांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे विषय असतात. त्यांना त्या त्या विषयांमधून पुढे कसं जायचं हे समजणं तितकच महत्त्वाच असतं. यासाठी समुपदेशन, मार्गदर्शन, सल्ला आज प्रत्येक व्यक्तीला गरजेचा आहे. एकता ग्रामविकास संस्थेच्या भोसरीतील सुरू झालेल्या ‘सखी संवाद केंद्रा’त समस्या निवारणासाठी संवादाची असलेली सुविधा अत्यंत उपयुक्त आहे, असे मत ॲड. शाहीन शिंदे यांनी येथे व्यक्त केले.
एकता ग्राम विकास संस्था या सामाजिक संस्थेच्या ‘सखी संवाद केंद्र’ या आगळ्यावेगळ्या केंद्राचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्राची भूमिका व कार्य पद्धती यावर सामाजिक विकास तज्ञ नंदकिशोर लोंढे यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक केले. असे उपक्रम समाजासाठी नेहमीच उपयुक्त ठरतील आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आम्ही करू, असे त्यांनी सांगितले.


कायदेतज्ञ प्रमिला गाडे, पिंपरी न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट अरुण खरात, बी. के. कांबळे यांनी या केंद्रास सहकार्य करण्यात येईल असे सांगितले. महिलांना आवश्यक त्या उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्याबाबत त्यांनी आश्वासित केले.
पिंपरी महापालिकेच्या समाज विकास संघटना समूह संघटिका रेश्मा पाटील, समाजसेविका सुरेखा इंद्राक्षे, ॲड. संगीता कुसाळकर, खराडी येथील संस्थेच्या सौ. सुरेखा शेंडे, स्मिता लोंढे, सामाजिक कार्यकर्त्या सीमंतिनी पवार, संस्थेचे संदीप बगाडे,अनंत भोसले आणि परिसरातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
Pune : थायलंडमध्ये शिवम गायकवाडचा डंका; आंतरराष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
सदर केंद्र दर सोमवार आणि बुधवारी भोसरीतील सद्गुरु नगर परिसरात शिवशंभो कॉलनीत सुरू असणार आहे त्यासाठी (9860426314) या क्रमांकावर अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा भोसले यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी सानप निंबोरे यांनी केले.