Team MyPuneCity – चिखली महात्मा फुलेनगर, चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) संघाचा १२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाच्या विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय समारंभात परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला (Senior Citizens) संस्कृती संवर्धन व विकास महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. अजित जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. निवृत्त मेजर दत्ताजी साबळे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे हेही कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेष सन्मानाच्या रूपाने महाराष्ट्रभर स्वच्छतेचा संदेश देणारे यशवंत कन्हेरे आणि शंभर गड-किल्ल्यांचे यशस्वी ट्रेक करणारे विश्वास सोहोनी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच पंचाहत्तरी पार केलेल्या (Senior Citizens) मनकर्णिका महाजन, सरोजनी मुळे, गायकवाड व मधुकर धकाते या ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे यांनी मागील वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतला व संघाच्या वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली.
संस्कृती जपण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा – डॉ. अजित जगताप
आपल्या मार्मिक भाषणातून डॉ. अजित जगताप यांनी देशभक्ती आणि सांस्कृतिक जतन यावर जोर दिला. ते म्हणाले, “भारताला भा-रत बनवायचे असेल तर आपली भाषा, भूषा, भोजन, भजन, भ्रमण आणि भक्ती जपण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीवर विविध षडयंत्रांच्या माध्यमातून होत असलेल्या आघातांपासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे.”
ते पुढे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांकडे (Senior Citizens) असलेले अनुभवाचे भांडार शाळा, महाविद्यालये आणि प्रबोधन वर्गांमधून तरुणांपर्यंत पोहोचवले पाहिजे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने संस्कारवर्ग आणि युवकांसाठी कार्यशाळा सुरू केली पाहिजे, यामुळे अनुभवांचे बाळकडू पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.”
डॉ. जगताप यांचे भाषण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत व गौरव केला.
गायन, नृत्य आणि स्नेहभोजनात समारोप
कार्यक्रमाच्या अखेरीस प्रसिद्ध गायक संजय मरळ यांच्या ‘आठवणीतली गाणी’ या भावसंगीत मैफिलीने वातावरण मंत्रमुग्ध केले. अनेक ज्येष्ठांनी मनसोक्त नाचून आपल्या आनंदाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद चौगुले यांनी केले. शेवटी स्नेहभोजनाने या वर्धापन दिन सोहळ्याची आनंददायी सांगता झाली. विलास रूपटक्के यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.