Team MyPuneCity – रुबी हॉल क्लिनिकमधील बहुचर्चित अवैध किडनी प्रत्यारोपण प्रकरणात नवे वळण आले असून, या प्रकरणातील संशयित डॉ. अजय अनिरुद्ध तावरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ जून २०२५ पर्यंत पोलीस (Ruby Hall Clinic) कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या गुन्ह्यातील तक्रार तत्कालीन आरोग्य सेवा मंडळाचे पुणे उपसंचालक डॉ. संजोग सिताराम कदम यांनी दाखल केली होती. त्यानुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ११ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती, कट रचणे आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन अशा गंभीर स्वरूपाच्या विविध कलमांखाली(Ruby Hall Clinic) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत ७ आरोपींविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तपासादरम्यान ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या रिजनल ऑथोरायझेशन कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बनावट व्यक्ती व कागदपत्रांवर किडनी स्वॅप प्रत्यारोपणास परवानगी (Ruby Hall Clinic) दिल्याचे निष्पन्न झाले.
डॉ. अजय तावरे सध्या पोर्शे कार अपघात प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, या नव्या गुन्ह्यात त्यांना प्रॉडक्शन वॉरंटवरून २८ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या गुन्ह्याचा तपास पुणे शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे हे करीत आहेत. अवैध अवयव प्रत्यारोपण प्रकरणातील ही अटक महत्त्वपूर्ण मानली जात असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता (Ruby Hall Clinic) आहे.