Team MyPuneCity – दिवंगत वैष्णवी हगवणे या तरुणीच्या हुंडाबळीनंतर तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता (Rita Gupta) यांनी आज (शनिवारी) दुपारी कस्पटे वस्ती, वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. दुपारी २ वाजता रिटा गुप्ता यांच्यासह मनसेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कस्पटे कुटुंबाची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.
या भेटीत त्यांनी (Rita Gupta) कुटुंबीयांचे सांत्वन करत या क्रूर घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी कुटुंबाला मनसेच्या वतीने सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं. कस्पटे कुटुंबीयांनी या प्रसंगी भावना व्यक्त करत, “आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी ठाम मागणी केली.
या भेटीनंतर रिटा गुप्ता (Rita Gupta) आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करत गुन्ह्याच्या तपासाबाबत माहिती घेतली व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
या प्रसंगी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण असून, स्थानिकांनीही आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, समाजातूनही या प्रकरणावर कठोर भूमिका घेण्याची मागणी वाढताना दिसत आहे.