Team My Pune City –महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या(Ravindra Chavan) ध्येयवादी नेतृत्वाखालील कार्याचा गौरव करणारे ‘ध्येयवादी देवेंद्रजी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झाले. भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस विजय शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “आजचा हा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ज्या नेत्याच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवी ओळख मिळाली, त्यांच्या कार्यावर आधारित हे कॉफी टेबल बुक साकारण्याचा मान मला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ विकासाची गती वाढवली नाही, तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे लाभ पोहोचवले. त्यांच्या दूरदृष्टीचे, कठोर परिश्रमाचे आणि जनसामान्यांसाठीच्या तळमळीचे दर्शन या पुस्तकातून घडेल अशी माझी खात्री आहे.”
Lonavala Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; पुढील ४८ तास रेड अलर्ट

यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “हे पुस्तक म्हणजे केवळ देवेंद्रजींच्या कार्याचा आढावा नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाची गाथा आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, जलयुक्त शिवार सारख्या योजना आणि राज्यातील पायाभूत सुविधांसाठी केलेले कार्य हे सर्व प्रेरणादायी आहे. हे कॉफी टेबल बुक महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असून, भावी पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची प्रेरणा देत राहील. ‘ध्येयवादी देवेंद्रजी’ हे पुस्तक महाराष्ट्राच्या ध्येयवादी प्रवासाचा एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल.”
या कॉफी टेबल बुकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आतापर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेण्यात आला आहे. यात त्यांच्या तरुणपणापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंतच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण घटना, त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेले ऐतिहासिक निर्णय, जनसामान्यांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि राज्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचा मागोवा घेण्यात आला आहे. उच्च दर्जाच्या छायाचित्रांनी सुशोभित केलेले हे पुस्तक त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे, जनसंपर्काचे आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेचे बोलके प्रतिबिंब आहे. सावी पब्लिकेशन द्वारे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे संपादन सोयम अस्वार यांनी केले आहे.
या प्रकाशन सोहळ्याला महामंत्री तथा आमदार विक्रांत पाटील, महामंत्री विजयभाऊ चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, मुकुंद कुलकर्णी, आमदार अमित गोरखे, आमदार किसन कथोरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस विजय शिंदे, नामदेव ढाके, सखी सोबती फौंडेशनच्या अध्यक्षा गिरीजा शिंदे, अमायरा शिंदे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, चंद्रकांत नखाते, , संजीवनी पांडे, राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, राम वाकडकर, प्रमोद चौधरी, धनंजय शाळीग्राम, सोयम अस्वार, दीपक नागरगोजे, संतोष शिंदे, कैलास सानप, अजित कुलथे, नेताजी शिंदे, मनोज ब्राह्मणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.