Team MyPuneCity – वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर तब्बल सात दिवसांपासून पोलिसांच्या हाताला न लागलेले आरोपी सासरे (Rajendra Hagawane) आणि दीर अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आज पहाटे साडेचारच्या सुमारास स्वारगेट परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या लपाछपीच्या प्रवासाने पोलिसांनाही चकवा दिला होता.
मृतदेह पाहून रुग्णालयातूनच पळाले…
७ मे रोजी वैष्णवी हगवणे हिचा मृतदेह औंध रुग्णालयात दाखल झाला. त्या वेळी तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (Rajendra Hagawane रा. दिघी) आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघेही रुग्णालयात पोहोचले होते. मात्र, अटकेची चाहूल लागताच त्यांनी रुग्णालयातून गुपचूप एक इंडीवर कार सोडून थेट थार गाडीतून पलायन केले. तिथूनच त्यांच्या लपून राहण्याचा सिलसिला सुरू झाला.
मुहूर्त लॉन्स ते पवना डॅम, आळंदी ते वडगाव मावळ…
अटक टाळण्यासाठी आरोपींनी दररोज ठिकाण बदलण्याचे तंत्र अवलंबले. सुरुवातीला त्यांनी (Rajendra Hagawane) मुहूर्त लॉन्स परिसरात एक दिवस काढला. त्यानंतर बंडू फाटक यांच्या पवना डॅमजवळील फार्महाऊसवर मुक्काम केला. १८ मे रोजी थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात हालचाल केली. त्यादरम्यान त्यांनी मोबाइल न वापरता संपर्क टाळला होता. तरीही पोलिसांच्या खबर्यांनी अखेर त्यांच्या हालचाली हेरल्या.
पोलिसांची सात दिवसांची शर्थ, अखेर मिळाली यशाची थार…
या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा सातत्याने पाठलाग केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना स्वारगेट परिसरात शोधून काढण्यात आले. पहाटे साडेचारच्या सुमारास एक झडप घालून पोलिसांनी या दोघांना अटक केली.
न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या वैष्णवीच्या कुटुंबाला दिलासा
वैष्णवीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाने संपूर्ण पुण्यात खळबळ उडवली होती. सतत वाढत्या हुंडाबळीच्या घटनांमध्ये वैष्णवीचे प्रकरण दुर्दैवी ठरले. आता आरोपींना (Rajendra Hagawane) अटक झाल्यामुळे तिच्या कुटुंबाला थोडासा का होईना, न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुरु आहे.