Team MyPuneCity – पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात (Rain in Lonavala) रविवारी पावसाने अक्षरशः कहर केला. अवघ्या २४ तासांत तब्बल २३२ मिमी (९.१७ इंच) पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले. रविवारी दिवसभर अविरतपणे पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. काही ठिकाणी रस्ते ओसंडून वाहू लागले, तर गवळीवाडा परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली.
नाले व जलवाहिन्या तुंबल्यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचून नागरिकांची गैरसोय झाली. वाहनचालकांना तसेच पादचारी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. सार्वजनिक वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. रविवारी सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते आणि अचानकपणे मुसळधार पावसाला सुरुवात (Rain in Lonavala) झाली. काही वेळातच पावसाचा जोर इतका वाढला की, पावसाचे पाणी सखल भागांमध्ये शिरले.
या वर्षी महाराष्ट्रात मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर, म्हणजे मे महिन्यातच दाखल झाला आहे. याव्यतिरिक्त अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्वमौसमी पावसाने देखील जोर धरला आहे. या वातावरणीय बदलांचा परिणाम म्हणूनच रविवारी लोणावळ्यासह संपूर्ण कोकण व घाटमाथ्याच्या भागात जोरदार पावसाची नोंद (Rain in Lonavala) झाली.
विशेष म्हणजे, अधिकृतपणे मान्सून सुरू होण्यापूर्वीच लोणावळ्यात आतापर्यंत एकूण ४१० मिमी (१६.१४ इंच) पावसाची नोंद झाली आहे. जूनमध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे आगामी दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
लोणावळ्यात अचानकपणे पडलेल्या या मुसळधार पावसामुळे प्रशासनासह आपत्कालीन यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या (Rain in Lonavala) आहेत.