Team My Pune City – पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून हैदराबाद(Pune) येथील 24 वर्षीय युवक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव गौतम गायकवाड असे असून, ही घटना बुधवारी (दि.20) संध्याकाळी घडली. या प्रकरणाने पोलिसांसमोर अपघात की कटकारस्थान, असा प्रश्न उभा राहिला आहे.
गौतम आपल्या चार मित्रांसह आणि एका महिला सहकाऱ्यासोबत सिंहगडावर (Pune) फिरण्यासाठी आला होता. किल्ल्यावर फोटो व व्हिडीओ काढल्यानंतर तो थोड्या वेळासाठी बाजूला गेला. मोबाईल फोन मित्राकडे ठेवून गेलेला गौतम मात्र परतलाच नाही. मित्रांनी शोध घेतला असता एमटीडीसी इमारतीजवळील कड्याजवळ त्याच्या चपला सापडल्या. मात्र सलग 24 तासांच्या शोधानंतरही गौतमचा मागमूस लागलेला नाही.
Mumbai-Pune National Highway : बोरघाटात जड-अवजड वाहनांवर बंदी; अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
दरम्यान, वनसंवर्धन समितीच्या कुंडणपूर तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागले आहे. गौतम बेपत्ता झाल्यानंतर दोन तासांनी हुडी घातलेला, चेहरा झाकलेला एक व्यक्ती एका वाहनाच्या मागे धावताना दिसतो. तो व्यक्ती नेमका गौतम होता की दुसराच कोणी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या फुटेजमुळे कटकारस्थानाचा संशय अधिकच गडद झाला आहे.
गौतमला शेवटचे मित्रांनी पिवळ्या रेनकोटमध्ये पाहिले होते; तर फुटेजमधील हुडी घातलेला व्यक्ती वेगळ्या कपड्यांत दिसतो. या विसंगतीमुळे गोंधळ अधिकच वाढला आहे.
हवेली पोलीस व वनविभागाने किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. कुटुंबीयांनी गौतम हा उत्साही आणि आनंदी स्वभावाचा मुलगा असल्याचे सांगून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक नागरिक व पर्यटकांनाही गौतम किंवा हुडी घातलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास पुढे आणण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या तरी गौतम गायकवाडच्या बेपत्ता होण्याचे कोडे उकललेले नाही. अपघात की कटकारस्थान, हे सुरू असलेल्या तपासातूनच स्पष्ट होणार आहे.