कला-क्रीडा-साहित्याला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण व्हावे : लक्ष्मीकांत देशमुख
महापालिका शाळांमध्ये ग्रंथालये निर्माण व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख
महानगरपालिका आयोजित ‘जागर अभिजात मराठीचा’ कार्यक्रमाचे उद्घाटन
Team My Pune City – मोठ्या शहरांमध्ये मराठी भाषेची गळचेपी होताना दिसत आहे. सर्व स्तरातील बहुतांश विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये उत्तम शिक्षण द्यावे, योग्य पद्धतीने कला-क्रीडा आणि साहित्याला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण व्हावे, प्रत्येक शाळा आदर्श शाळा बनविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, ज्या योगे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा प्रभाव कमी होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, राज्याच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. वाचनसंस्कृती निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये ग्रंथालये निर्माण करून तेथे उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे महानगरपालिका, सांस्कृतिक केंद्र आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागर अभिजात मराठीचा’ हा गाणी, गोष्टी, प्रवचन, कविसंमेलन आणि अभिवाचन यांचा संगम असलेल्या एक दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. 3) लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बालसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते ल. म. कडू, डॉ. संगीता बर्वे, राजीव तांबे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त किशोरी शिंदे, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक आणि महापालिका सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेश कामठे, संवाद पुणेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे संयोजक सुनील महाजन, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कामगार विभाग आयुक्त नितीन केंजळे, उपायुक्त वसुंधरा बारवे, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, आशा उबाळे मंचावर होते. रोपट्यास जलार्पण करून आणि फलकावर मराठी भाषेत स्वाक्षरी करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
भाविष्यात मराठी भाषा प्रवाहित होण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर काय उपाययोजना करणे अपेक्षित आहे या विषयी लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिणे, बोलणे व वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांच्या अंगातील कला-क्रीडा गुण ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे आणि या करिता शासनाच्या शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, वाचन हे निरंतर शिक्षण असते, त्यामुळे भरपूर वाचा, वाचनाची गोडी लावून घ्या आणि जे वाचाल ते तुमच्या भाषेमध्ये सारांश रूपात लिहित रहा. कविता वाचा, गुणगुणा आणि हसतखेळत अभ्यास करा.
Gurwar Peth Crime : गुरुवार पेठेतील सराफा पेढी चोरी प्रकरणात एक आरोपी उत्तर प्रदेशातून अटक, 36 किलो चांदी जप्त
Vijaya Dashmi : श्रीमंत सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या शस्त्रपूजनाचा पारंपरिक सोहळा उत्साहात
ओमप्रकाश दिवटे म्हणाले, मराठी भाषा टिकविण्यासाठी तसेच भाषेचे आदान प्रदन व्हावे या करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ल. म. कडू म्हणाले, आपण जे पाहतो ते आपल्या शब्दात मांडत, गंमत जंमत अनुभवत शब्दचित्र कागदावर उमटविण्याचा प्रयत्न करा.
‘भाषेमुळे आपण घडतो, भाषेला आपण घडवितो’ ही कविता विद्यार्थ्यांकडून सामूहिकरित्या गाऊन घेत डॉ. संगीत बर्वे म्हणाल्या, प्रत्येकाने मराठी वाचायला, बोलायला आणि लिहायला प्रयत्न करून प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
गोष्टीतून मुलांशी संवाद साधत राजीव तांबे म्हणाले, भाषा जेव्हा मुलांकडून मोठ्या व्यक्ती शिकतात आणि मुले मोठ्यांकडून शिकतात म्हणजेच भाषेचे आदानप्रदान होते तेव्हाच भाषा अभिजात होते.
स्वागतपर प्रास्ताविकात किशोरी शिंदे म्हणाल्या, महानगरपालिकेचा अमृत महोत्सव आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक व शिक्षण विभाग एकत्र येऊन हा उपक्रम करीत आहे. मराठी भाषेची मुळे खोलवर रुजलेली आहेत. या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषा प्रवाहित होण्यास मदत होईल.
वसुंधरा बारवे यांनी शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार आशा उबाळे यांनी मानले.