Team My Pune City –तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची(Pune) परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिष्य परिवारातर्फे ‘नादब्रह्मांजली’ या गायन-वादनाच्या कार्यक्रमातून सांगितीक मानवंदना अर्पण करण्यात आली.
गोखलेनगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सलीम अख्तर यांचे शिष्य देवेंद्र भावे यांच्या एकल तबलावादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीन तालमध्ये पेशकार, कायदे, रेले सादर केला. त्यानंतर पेशकार आणि द्रुतलयीत गत आणि चक्रदार सादर केले.
विश्वास जाधव यांचे शिष्य जितेश झंवर यांनी आपल्या तबला वादनाची सुरुवात तीन ताल सादर करून केली. यात तुकडे, कायदे, रेले तसेच उ. अमीर हुसैन खाँ, उस्ताद जहाँगीर खाँ यांच्या रचना प्रभावीपणे सादर केल्या.
उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांची शिष्या युवा व्हायोलिनवादक श्रुती राऊत हिच्या वादनाने मैफलीत रंग भरले. तिने आपल्या वादनाची सुरुवात पुरिया धनाश्री या रागाने केली. ‘पायलिया झंकार मोरी’ या तीन तालातील रचनेने सादरीकरणाची सांगता केली.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला
मैफलीचा कळसाध्याय ठरले ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अर्शद अली खान यांचे सादरीकरण. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात पुरिया कल्याणमधील विलंबित तालातील ‘आज सोबन’ या रचनेने केली. त्यानंतर द्रुत तराणा ऐकविला. ‘कारी बदरिया छायी’ ही गौड मल्हार रागातील बंदिश सादर केल्यानंतर ‘मोरे आए कुंवर कन्हाई’ ही बंदिश ऐकविली.
कलाकारांना सलीम अख्तर (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा कुरेशी यांनी केले.