प्रसिद्ध सतारवादक संदीप आपटे यांची विशेष मैफल
संगीताचार्य पं. द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन
Team My Pune City –गडद होत जाणाऱ्या सायंकालीन वातावरणाचा मूड यमन रागातून (Pune)नेमका व्यक्त करणारे सतारीचे झंकार अनुभवण्याची संधी रसिकांना शनिवारी सायंकाळी मिळाली. प्रसिद्ध सतारवादक संदीप आपटे यांचे राग यमन आणि राग तिलककामोद यांचे अक्षरशः मंत्रमुग्ध करणारे वादन रसिकांना वेगळ्या विश्वात घेऊन गेले.
निमित्त होते संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान प्रस्तुत, ख्यातनाम सतारवादक उस्ताद विलायत खान साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित विशेष वादन मैफिलीचे. कोथरूड येथील मयूर कॉलनीमधील एमईएस सभागृहात ही सायंकालीन रागांची मैफल रंगली.
Pandit Vidyasagar: हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागर
Vadgaon Maval: श्री संत तुकाराम कारखान्याचा २८ वा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ सपन्न
प्रसिद्ध सतारवादक संदीप आपटे हे उस्ताद विलायत खान यांचे शिष्य. खानसाहेबांकडे त्यांनी तब्बल 18 वर्षे तालीम घेतली. त्यामुळे उस्ताद विलायत खान यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणारी ही मैफल त्यांच्याच शिष्याकडून ऐकण्याचे औचित्य साधले गेले. गायकी अंगाने वादन, हे त्यांच्या सादरीकरणाचे वैशिष्ट्य याही वादनात प्रकर्षाने जाणवले.
संदीप यांनी वादनाचा प्रारंभ राग यमनने केला. आलाप, जोड, झाला या क्रमाने या वादनाची खुमारी वाढत गेली. अलीकडच्या काळात अतिशय दुर्मिळ झालेले सविस्तर, सुदीर्घ आणि उस्ताद विलायत खानसाहेब यांची आठवण करुन देणारे हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य होते. रागवाचक प्रत्येक सुराचे रागातील स्थान, नेमकेपणाने अधोरेखित करत संदीप यांनी आलापीतूनच यमनचे नादचित्र रेखाटले. विलंबित नंतर मध्य आणि द्रुत लयीत आज मोरे घर आईलो बलमा आणि एसो सुंदरवा सुंदरवा बालमवा या बंदिशी त्रितालात सादर करून रागाचे नादसौंदर्य रसिकांसमोर उलगडले. त्यानंतर त्यांनी राग तिलककामोद तेवढ्याच प्रभावीपणे प्रस्तुत केला. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबल्यावर वादनाची रंगत वाढविणारी साथ केली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंदराव बेडेकर उपस्थित होते. प्रारंभी प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. श्रुती पोरवाल यांनी सूत्रसंचालन केले. अमित पटवर्धन आणि सागर खांबे यांनी कलाकारांचा सत्कार केला.