आधुनिक विज्ञानातील शोध भारतीय ज्ञान परंपरेतूनच : निलेश ओक
वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता
Team My Pune City -भारतीय वेदशास्त्र म्हणजे एक ज्ञानपरंपरा असून ते (Pune)अनंत आहे. वेदशास्त्रात शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प असे सहा विभाग असून यातील ज्योतिष हे कालगणनेसाठी वापरले जाते. भारतीय संस्कृतीनुसार इतिहास याचा अर्थ विशिष्ट परिस्थितीचा अथवा घटनेचा सखोल अभ्यास असा होय. आधुनिक विज्ञानातील शोध हे आपल्या भारतीय ज्ञान परंपरेने जगाला दिले आहेत. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतीय ज्ञान परंपरेचे भांडार, खजिना प्रयत्नपूर्वक दडवून ठेवण्यात आला. सूर्य सिद्धांतात जे सांगितले गेले ते आजही आधुनिक विज्ञानाला पूर्णपणे कळलेले नाही, असे प्रतिपादन रामायण-महाभारताची साधार कालनिश्चितीकर्ते निलेश ओक यांनी केले.
वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी (दि. 23 ऑगस्ट) टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. समारोप समारंभात ‘प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र’ या विषयावरील व्याख्यानात निलेश ओक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या अध्यक्षा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक होत्या. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, वे. शा. सं. विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, उपाध्यक्ष डॉ. मल्हार कुलकर्णी मंचावर होते.
महाभारत व रामायणातील खगोलशास्त्रीय निष्कर्षांचे विश्लेषण केल्यास भारतीय प्राचीन घटनांच्या काळाचे आकलन होते, असे सांगून निलेश ओक म्हणाले, भारतीय ग्रंथांचे पुरावे देऊन दोन लाख 20 हजार वर्षांपूर्वीचा इतिहासही अभ्यासला जाऊ शकतो. शब्द अथवा उपमान, अनुमान, प्रत्यक्ष, आगम या पद्धतीने प्रमेये मांडल्यास महाभारत, रामायण यांचा कालावधी समजून घेता येतो. श्रद्धेची शहानिशा करत आपल्यातील जिज्ञासा जागृत ठेवून अभ्यास केल्यास वेदशास्त्रामध्ये कालगणनेचे अनेक पुरावे आढळतात. यात ग्रह नक्षत्रांची मांडणी महत्त्वाची ठरते. भारतीय खगोल शास्त्र हे अतिशय पुरातन शास्त्र असून यातील सूर्यसिद्धांत, नक्षत्रांची स्थिती, अक्षांश-रेखांश यांचा अभ्यास केल्यास कालखंड जाणून घेण्यास मदत होते. सूर्य सिद्धांतातील पाचशे श्लोकांद्वारे भारतीय खगोलशास्त्र समजून घेता येते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, भारतीय ज्ञान परंपरा समजून घेणे ही काळाची गरज असून भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासाठी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या माध्यमातून अखंडितपणे कार्य केले जात आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेविषयी पदवी, पदव्युत्तर, विद्यावाचस्पतीपर्यंतचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. खगोलशास्त्रीय दृष्टीकोन विस्तारण्यास निलेश ओक यांच्या व्याख्यानातून मदत झाली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
WorkShop : ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
या वेळी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या सुवर्णमहोत्सवी ‘स्मृतिगंध’ या स्मरणिकेचे, वेदशास्त्रोत्तेजक सभेचे माजी कार्यवाह कै. परशुराम परांजपे यांनी लिहिलेल्या ‘सम्मानपत्रसमुल्लास: ’ तसेच डॉ. ज्योत्स्ना खरे लिखित ‘सार्थ श्रीविष्णुसहस्रनाम’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘स्मृतिगंध’ स्मरणिकेचे संपादक सु. गो. पाटील, श्रद्धा परांजपे उपस्थित होते. प्रकाशनांविषयी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचे कार्यवाह अविनाश चाफेकर यांनी माहिती दिली.
वेदशास्त्रोत्तेजक सभेतील निवडक पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा परिचय वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पुंड यांनी केले तर आभार भगवंत ठिपसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वेदमूर्ती श्यामसुंदर धर्माधिकारी यांनी सादर केलेल्या वैदिक राष्ट्रगीताने झाली.