विदुषी रंजनी, विदुषी गायत्री यांचे कर्नाटकी गायन तर विदुषी झेलम परांजपे यांचा ओडिसी नृत्याविष्कार
Team My Pune City –आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे(Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे शनिवारी (दि. १३) त्यांच्या बंदिशींवर आधारित ‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ या विशेष संगीत-नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा आधुनिक चेहरा समजल्या जाणाऱ्या विदुषी रंजनी आणि विदुषी गायत्री यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या अभ्यासपूर्ण बंदिशींवर कर्नाटकी शैलीने केलेले सुमधूर गायन तसेच सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना विदुषी झेलम परांजपे यांनी केलेला नृत्याविष्कार यातून पुणेकर रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
Chinchwad: श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या वतीने चैतन्य महाराज कबिरबुवा यांना ” वैष्णव सेवा पुरस्कार”
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस डॉ. विकास कशाळकर, विदुषी झेलम परांजपे, विदुषी रंजनी, विदुषी गायत्री, डॉ. मनिषा रविप्रकाश, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम.डी. व कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले.
विदुषी रंजनी आणि विदुषी गायत्री यांनी बुद्धी व भावनात्मकतेचा अनोखा संगम साधत डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींमधून प्रेरणा घेत त्याला कर्नाटकी रागांची जोड देत मैफलीची सुरुवात राग हंसध्वनीने केली. डॉ. प्रभा अत्रे यांची ‘दरसन लागी अखिया’ तर गुरू त्यागराज यांची ‘रघुनायका’ या दोनही बंदिशींचा अनोखा मिलाफ साधत प्रभावीपणे सादरीकरण केले. त्यानंतर सरस्वती रागातील मा शारदेला वंदन करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे रचित ‘माता सरस्वती देवी’ या रचनेसह ‘सरस्वती नमोस्तुते शारदे विद्याप्रदे’ या रचना सुमधूरपणे सादर केल्या. कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे वैशिष्ट्य दर्शविणारे रागम् तालम् पल्लवी सादर करताना राग किरवाणीमधील ‘नंद नंद मनमोहन श्यामसुदंर मधुसूदन’ ही रचना सादर करून रागमालिका ऐकविली. मारुबिहाग या रागाला समांतर असणारा कर्नाटकी शैलीतील मांड राग मुर्छनेसह सादर करून रसिकांची मने जिंकली. तबला आणि मृदंगम यांची तनी आवर्तन जुगलबंदी रसिकांना विशेष भावली. गायन मैफलीची सांगता भैरवी रागातील डॉ. प्रभा अत्रे रचित ‘मुखी नाम तुझे रे गोविंदा’ या मराठी रचनेने करून रसिकांना मोहित केले. विद्वान निशांत चंद्रन (व्हायोलिन), साई गिरिधर (मृदंगम), निखिल फाटक (तबला), मनिषा पिंपळगावर, निर्मला (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी झेलम परांजपे यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित ओडिसी नृत्याचे मनमोहक सादरीकरण केले. राग शंकरा आणि कौशिक भैरव यावर आधारित ‘ओम नम: शिवाय आदिनाथ’, शिवशंकर, रौद्ररूप प्रलयंकर’ या शिवआराधनेने त्यांनी नृत्यप्रस्तुतीची सुरुवात केली. कृष्णलीलेचे वर्णन करणारी राग तिलंगमधील ‘कान्हा मानेना मानेना’ तसेच मिश्र देसमधील ‘जादूभरी तोरी मुरली’ या रचनांवर नृत्य सादरीकरण करताना राधा-कृष्ण आणि मुरली यांच्यातील अद्वैत रूप उलगडून दाखविले. त्यानंतर ऋतुंवर आधारित दादरा सादर करताना ‘बसंती चुनरिया’ या रचनेवर सौंदर्यपूर्ण नृत्य दर्शविले. मिश्रनायकी कानडा रागावर आधारित बारामासी दर्शविताना ‘जाय बसे है पिया’ या रचनेतून पारंपरिक विचारातून प्रतिकात्मक वेगळेपण प्रकट केले. कार्यक्रमाची सांगता मिश्र भैरवीवर आधारित ‘हे गोविंद गोपाळ’ या रचनेवर नृत्य सादर करून ओडिसी नृत्यातील ‘सुकांत वदनम्’ या मोक्षाच्या बोलांवर नृत्याविष्कार सादर केला. उत्तम पदलालित्य, सौंदर्यभाव प्रकट करणारे हे ओडिसी नृत्य रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले. त्यांना शुभ्रदीप साहू (गायन), रोहन डहाळे (मर्दळ), अपर्णा देवधर (सतार), भुवन ढकाल (बासरी) यांनी साथसंगत केली.
डॉ. प्रभा अत्रे यांनी बंदिशींच्या रचना करताना अभ्यासकाच्या दृष्टीने विचार करून भारतीय शास्त्रीय संगीताला उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. या रचना करताना त्यांनी संगीतातील गेय शब्दांचा अभ्यासपूर्ण वापर केलेला असून त्यांच्या बंदिशी अर्थपूर्ण तसेच सोप्या भाषेतील आहे.
डॉ. विकास कशाळकर
कलाकारांचा सत्कार डॉ. मनिषा रविप्रकाश, डॉ. अशोक वळसंगकर, डॉ. रघुवीर कुलकर्णी यांनी केला. सूत्रसंचालन आरती नायर यांचे होते.