एस. एन. बी. पी. विद्यालय आयोजित गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची दाद
Team My Pune City –येरवडा परिसरातील प्रतिष्ठीत एस. एन. बी. पी. माध्यमिक(Pune) व उच्च माध्यमिक विद्यालय आणि एस. ई. सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वरयज्ञ संगीत महोत्सवात सुप्रसिद्ध गायक-वादकांचे बहारदार सादरीकरण झाले. या अनोख्या सादरीकरणातून रसिकांना एक वेगळी सांगीतिक भेट मिळाली.
महोत्सव येरवडा येथील एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सरस्वती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे.
महोत्सवाच्या सुरुवातीस प्रास्ताविकात एस. एन. बी. पी. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. वृषली भोसले म्हणाल्या, पूर्व पुणे परिसरातील रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा तसेच भारतीय शास्त्रीय कला व संस्कृतीच्या वारशाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने स्वरयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या करिता शाळेतील विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात सहभागी करून घेण्यात येते.
मैफलीची सुरुवात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी सुरुवातीस राग गौड मल्हार रागातील विलंबित तीन तालातील ‘मानन करिए तुमरे कारन’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘बैरि भयो सजनिया’ ही बंदिशी अतिशय सुरेलपणे ऐकविली. सानिया पाटणकर यांनी आपल्या गायन मैफलीची सांगता द्रुत आडाचौताल मधील ‘उमड घन गगन आयो रे’ या पारंपरिक बंदिशीने केली. उत्तम फिरत असलेला सुमधुर आवाज, बहारदार ताना, सुश्राव्य गायनाने त्यांनी मैफलीत रंग भरले. विनायक गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी), वेदवती परांजपे (सहगायन), नितीन महाबळेश्र्वरकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
Pune: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर
Talegaon Dabhade: कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऍथलेटिक स्पर्धेत मारली बाजी


या नंतर सत्याजित तळवलकर यांचे एकल तबला वादन झाले. त्यांनी तबल्यावर जोरकस वादन करून तीन ताल सादर केला व रसिकांची वाहवा मिळविली. त्यांच्या वादनातील दाया बायाचे उत्तम संतुलन, आकर्षक लय आणि वादनातील चपळता पाहून रसिक मंत्रमुग्ध झाले. अभिषेक शिनकर (लेहरा) यांनी समर्पक साथ केली.
शेवटच्या सत्रात मेवाती घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका मधुश्री नारायण यांचे सुश्राव्य, सुमधुर गायन रंगले. त्यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात मेवाती घराण्यातील प्रसिद्ध राग नट नारायणमधील विलंबित एकतालातील ‘जब से छब देखी’ या बंदिशीने केली. त्यानंतर झपतालात ‘निरंकारा’ ही रचना सादर केली. मैफलीची सांगता ‘माता रानी भवानी जगत् जननी माँ’ या रचनेने केली. विनायक गुरव (तबला), संतोष घंटे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एस. एन. बी. पी. शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन-वादनाचे बहारदार सादरीकरण केले. कलाकारांचा सत्कार डॉ. वृषली भोसले, प्राचार्य रश्मी शुक्ला यांनी केले.