जागतिक संग्रहालय दिनानिमित्त साईनाथ मंडळ ट्रस्टचा विधायक उपक्रम
Team MyPuneCity – बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने जागतिक संग्रहालय दिनाचे निमित्त साधून ४० विद्यार्थ्यांना आज (दि. १८) नानावाडा येथील स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालयाची सफर घडविण्यात आली.
जागतिक संग्रहालय दिवसानिमित साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने गेल्या ११ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संग्रहालयात नेण्यात येत आहे. पेशवे सरदार लढवैय्ये नाना फडवणीस, आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू, आदिवासी क्रांतिकारक, १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले क्रांतिकारक तसेच समाजसुधारक शाहू महाराज, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर यांची चित्रे, म्युरल्स, भित्तीचित्र, शिल्प व दृश्यश्राव्य माध्यमातून विविध प्रसंग उत्तम प्रकारे दाखविण्यात आले. क्रांतिकारकांवरील चित्तथरारक प्रसंगी अनुभवायला मिळाल्यानंतर मुले क्रांतिकारकांच्या चरणी नतमस्तक झाली.
संग्रहालयांद्वारे आपल्या देशातील समृद्ध वारसा, सांस्कृतिक विविधता, ऐतिहासिक प्रसंग यांचे दर्शन घडते. तसेच ज्ञान, माहिती व प्रेरणा मिळते म्हणून डोळस नजरेने संग्रहालये पाहणे गरजेचे आहे. समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नवीन पिढीला समजावा म्हणून आज चाळीस विद्यार्थ्यांना संग्रहालयाची सफर घडविण्यात आली, असे मनोगत साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांनी व्यक्त केले.
सैनिक नगर येथील श्री राम मंडळ ट्रस्टचे आशिष गुंडकल, अष्टविनायक मित्र मंडळाचे अभिजीत कदम, अजिंक्य मित्र मंडळाचे उमेश शेवते व श्री शिवाजी मित्र मंडळाचे गोविंदा वरनदानी तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतिकारक संग्रहालयातील मनपा अधिकारी सचिन झगडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Chinchwad: पालिकेकडे परवानगीचा कागद पूर थांबवू शकणार नाही- राजेंद्र सिंह

उपक्रमाची संकल्पना व आयोजन साईनाथ मंडळाचे अध्यक्ष पियूष शहा यांचे होते. तन्वी ओव्हाळ, गंधाली शहा, समीक्षा सोनवणे, नंदू ओव्हाळ, सम्राट कणसे, सागर बनकर आदी उपस्थित होते.