वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी आर्थिक पाठबळ
Team MyPuneCity –ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांनी वंचित, गुणवंत विद्यार्थ्यांच्या (Pune)सक्षमीकरणासाठी स्थापन केलेल्या शिकारपूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने दहा विद्यार्थ्यांना आज (दि. 30) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मल्टिव्हर्सिटी ग्रुप, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि परम महासंगणकाचे निर्माते पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ. विजय भटकर, नचिकेत भटकर, एम. के. सी. एल.चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, एम. के. सी. एल.चे महाव्यवस्थापक अतुल पटोडी आदी उपस्थित होते.
एम. के. सी. एल.तर्फे कौशल्य वाढीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. येथे विविध शैक्षणिक शाखांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉ. भटकर यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.
शिष्यवृत्ती योजनेविषयी माहिती सांगताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, महत्त्वाकांक्षी युवा पिढीला सक्षम करून त्यांना त्यांच्या पायवर उभे राहण्यासाठी मदत व्हावी या करीता ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. भारताची ओळख युवकांचा देश अशी आहे. आय. टी. म्हणजे ‘इंडियन टॅलेंट’ असून इनोव्हेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीने ‘इंडियाज टुमॉरो’ बनावे. विद्यार्थ्यांनी व्यक्तीमत्त्व विकास साधत कायम स्वरूप शिष्याची भूमिका स्वीकारून नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी जेणेकरून उद्याचा आत्मनिर्भर विकसित भारत निर्माण होण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी आर्थिक मदतीमुळे ऐच्छिक शिक्षण घेण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली. अतुल पतोडी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत भाग्यश्री जाधव यांनी केले तर आभार विश्वजीत उत्तरवार यांनी मानले.