ज्ञानवंतांच्या संस्थेतील सत्कार हा आशीर्वाद : पराग ठाकूर
ज्ञानाच्या दरबारात विज्ञानाची प्रतिष्ठापना : पराग ठाकूर
Team My pune city –गणेश मंडळे पुणे शहराच्या रक्तवाहिन्या (Pune)आहेत. गणेश मंडळांतर्फे अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. सेवासदन ही वेगळेपणाने विचार करणारी संस्था असून या संस्थेच्या प्रांगणात होणारा गणेश मंडळांचा सत्कार हा ज्ञानवंतांच्या संस्थेकडून गणेश मंडळांना मिळालेला आशीर्वादच आहे. ज्ञानाच्या दरबारात विज्ञानाची प्रतिष्ठापना होत आहे, असे गौरवोद्गार ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्राचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी काढले.
प्रौढ मानसिक दिव्यांग व्यक्तींकरिता कार्यरत असलेल्या सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या वतीने सुरू असलेल्या गणपती विक्री उपक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त अनेक वर्षे सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या २५ गणेश मंडळांचा विशेष सन्मान आज (दि. १८) करण्यात आला. त्यावेळी ठाकूर बोलत होते. एरंडवणे येथील सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, साखळीपीर गणेश मंडळाचे रवींद्र माळवदकर, पराग ठाकूर यांच्या हस्ते शहराच्या विविध भागातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा वर्षा परांजपे, उपाध्यक्ष नितीन लेले मंचावर होते. गणेश मंडळांच्या उपक्रमांची माहिती पियूष शहा यांनी दिली.
सुरुवातीस संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे यांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यशाळेच्या उपक्रमांविषयी माहिती देत प्रास्ताविकात संस्थेच्या व्यवस्थापिका मेघना जोशी यांनी गणेश मूर्तींच्या विक्रीतून मिळणारी रक्कम कार्यशाळेतील मानसिक दिव्यांग व्यक्तींना मानधन स्वरूपात दिली जाते, असे सांगितले.
सुनील रासने म्हणाले, सेवासदनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्याचप्रमाणे पुण्यातील अनेक गणेश मंडळेही समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असतात.
Pune: ‘ज्येष्ठांमधील एकाकीपणा – कारणे आणि उपाय’ विषयावर चर्चासत्र
Talegaon Dabhade : महिलांना स्वावलंबनाचे बळ ; तळेगाव दाभाडे येथे ३० दिवसीय वस्त्रचित्र कला प्रशिक्षण संपन्न
रवींद्र माळवदकर म्हणाले, मानसिक दिव्यांग मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य संस्थेच्या विविध उपक्रमांमधून घडत आहे. आम्हा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना या वास्तूत समाजमंदिराचे दर्शन घेडले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ म्हणाले, गणेश उत्सव मंडळे ही जनशक्तीचे प्रतिक आहेत. त्यांच्या व ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून समाजभान जागविण्याचे कार्य घडत आहे. हे कार्य समाजासमोर येणे आवश्यक आहे.
मान्यवरांचा सन्मान वर्षा परांजपे व नितीन लेले यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीस संस्थेच्या उपक्रमांची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली.
कार्यशाळेला सहकार्य करणारे रवींद्र घाडगे, दयानंद रावडे, स्वप्नील सकट, यांच्यासह विशेष विद्यार्थी योगेश शिंदे व साईराज कोंढरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना जोशी यांनी केले तर संस्थेच्या सहसचिव अर्चना शहाणे यांनी आभार मानले.