श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम् दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्,शृंगेरी, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे आयोजित वैदिक संमेलनाचा समारोप
Team My Pune City –भारतीय ज्ञानपरंपरा आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा स्वरूपाची वैदिक संमेलने आयोजित करण्यात यावीत तसेच याविषयी संशोधनात्मक कार्य व्हावे ज्या योगे वेदाभ्यास, ज्ञानपरंपरेचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या अध्यक्ष व टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी केले.
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम् दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्,शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचा आज (दि. 3) समारोप झाला. त्या वेळी डॉ. गीताली टिळक अध्यक्षपदावरून बोलत होत्या. वासुदेव निवास, पुणेचे पीठाधीश आणि विश्वस्त योगश्री प.पू. शरदराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, कार्यवाह श्रद्धा परांजपे व्यासपीठावर होते. संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले होते.
डॉ. गीताली टिळक पुढे म्हणाल्या, वेदशास्त्रातील शिक्षण विषयात पदवी अभ्यासक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू करण्याचा मानस आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व टिळक कुटुंबिय वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहेत. टिळक नावाबरोबर जबाबदारी येते या वडिलांच्या शिकवणुकीमुळे मी वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, असे त्यांनी आवजूर्न नमूद केले.
वेदाध्यायनाला साधनेची-चैतन्याची जोड मिळाल्यास शांती प्राप्ती होते, असे सांगून प.पू. शरदराव जोशी यांनी श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम् दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्,शृंगेरी आणि वासुदेव निवासाची परंपरा यांच्यातील धार्मिक अनुबंधांविषयी सविस्तर माहिती दिली.
Pimpri Chichwad Crime News 3 August 2025: आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा, दोघांना अटक
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक; उद्या नवलाख उंब्रेच्या भैरवनाथ मंदिरात सभा
संमेलनानिमित्त सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञीय वृक्षांचे समकालीन महत्त्व या विषयावर वैद्य कौशिक दाते (सोलापूर) यांचे व्याख्यान झाले. आयुर्वेद शास्त्रानुसार ग्रहांप्रमाणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या वृक्षांच्या गुणधर्माबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले.
प्रास्ताविकात श्रद्धा परांजपे यांनी संस्थेच्या कार्याची ओळख करून देत वैदिक संमेलानाच्या तीन दिवसातील उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी संस्थेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर खांडेकर, तुषार भट यांनी केले तर आभार श्रीकांत फडके यांनी मानले.