Team MyPuneCity – राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, मंगळवारी संध्याकाळपासून पुणे (Pune Rain), लोणावळा, मुंबईसह अनेक भागांत पावसाचा जोर अनुभवायला मिळाला. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले, तर वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.
पुण्यात जनजीवन विस्कळीत, चिंचवडमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद
पुण्यात मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) जनजीवन विस्कळीत केले. सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, सदाशिव पेठ, सहकार नगर, धनकवडी, कात्रज, कोंढवा आणि खडकवासला परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार चिंचवडमध्ये सर्वाधिक १०१ मिमी पावसाची नोंद झाली. तळेगाव ढमढेरे (८५.५ मिमी), हडपसर (७६ मिमी), डुडुळगाव (७०.५ मिमी) आणि वडगावशेरी (६७ मिमी), एनडीए (६५.५ मिमी) या परिसरातही पावसाचा जोर कायम राहिला.
Pune News: हृदयद्रावक! विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
याशिवाय लवासा (४९ मिमी), हवेली (४९ मिमी), तळेगाव (४४ मिमी), कुरवंडे (३६.५ मिमी), गिरीवन (४२ मिमी), लवळे (३५.५ मिमी), नारायणगाव (२८ मिमी), पुरंदर (१७.५ मिमी), कोरेगाव पार्क (२८ मिमी), भोर (६ मिमी) येथेही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
लोणावळ्यातही पावसाची दमदार हजेरी
थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातही काल दिवसभरात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उन्हाळ्यामुळे ओस पडलेले पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. सततच्या पावसामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुंबईत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी, मात्र आज उघडीप
मुंबईत मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र मध्यरात्रीपासून पावसाला उसंत मिळाल्याने बुधवारी सकाळपासून मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर आणि नवी मुंबई या भागांमध्ये हवामान उघड झाले आहे. परिणामी, उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतूक आणि विमानसेवा सुरळीत सुरू आहे.
Anna Bansode : लोणावळ्यात अण्णा बनसोडे यांच्या गाडीचा किरकोळ अपघात; सर्वजण सुखरूप
पुणे जिल्ह्याचा पुढील ४८ तासांचा हवामान अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात पुढील ४८ तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Pune Rain) पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह जोरदार सरी देखील येऊ शकतात. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळी पावसाची शक्यता अधिक असून, गडद ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग १० ते १५ किमी/ताशी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यभरात पावसाने उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा दिला असला, तरी काही भागांतील मुसळधार सरींमुळे वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही अशाच स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.