Team MyPuneCity – पश्चिम महाराष्ट्रातील बारामती , दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात कालपासून ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. अशातच नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गापर्यंत आले आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ( Baramati Rain news) आज पहाटे या भागाची पाहणी केली.
बारामती तालुक्यात गेल्या 24 तासांत 87 मिलिमीटर पाऊस झाला. याठिकाणी वर्षात साधारणपणे 450 मिलिमीटर पाऊस तालुक्यात पडतो. गेल्या 5 दिवसांत त्यापैकी 314 मिलिमीटर पाऊस पडला आहे. नीरा डावा कॅनॉल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. तसेच पाऊस( Baramati Rain news) जास्त झाल्याने शेतकऱ्यांना पाणी शिरून फटका बसला आहे.
नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी पालखी महामार्गावर आलं असून काटेवाडी-भवानीनगर हा रस्ता बंद करण्यात आलाय. या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली. पिंपळीत हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरात असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसला.
कालवा फुटल्याने याठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. पेन्सिल चौकाजवळील दोन धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावर पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेली . यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माळशिरस तालुक्यात झालेल्या पावसामुळे नातेपुते ते बारामती रस्त्यावरील कुरभावी येथे नीरा नदी पुलावर आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. आज पहाटे अडीचच्या सुमारास कुरभावी येथील एका रानात अडकलेल्या कुटुंबाला एनडीआरएफच्या टीमने सुरक्षितपणे बाहेर ( Baramati Rain news) काढले आहे.
याशिवाय माळीनगर जवळ असणाऱ्या संग्राम नगर येथून 15 ते 20 कुटुंबांना पहाटे हलविण्यात आले असून यांच्या घरात पाणी घुसले आहे. नीरा नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे माळशिरस तालुक्यातील 500 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
या ढगफुटी सदृश पावसाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे. निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 14 इंच इतकी आहे. त्यापैकी 7 इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे अजित पवार ( Baramati Rain news) यांनी सांगितले.