Team My Pune City -पुणे रेल्वे स्थानकावरील सततची गर्दी आणि ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मोठा पाऊल उचलले ( Pune Railway Station )असून, लवकरच पुण्याच्या रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी तळेगाव ते उरळी (बायपास मार्गे) दरम्यान तब्बल ८० किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर एकूण ९ नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी केली जाणार असून, यामुळे पुणे स्थानकाचा ताण लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने अंतिम प्रकल्प ( Pune Railway Station )अहवाल (डीपीआर) सादर केला आहे. प्रस्तावित हा दुहेरी मार्ग तिसरी व चौथी मार्गिका म्हणून काम करणार असून, तो 160 किमी/तास या वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी सक्षम असेल. या मार्गावर न्यू तळेगाव, वराळे, संत तुकाराम महाराज, कुरुळी (चाकण), संत ज्ञानेश्वर महाराज, वाघोली, कोलवडी, कुंजीरवाडी कॅबिन व उरळी (बायपासमार्गे) ही नऊ स्थानके प्रस्तावित असून, न्यू तळेगाव हे या मार्गाचे मुख्य स्थानक असेल.
पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर आणि खडकी टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. डिसेंबर २०२५ अखेर ही दोन्ही टर्मिनल कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे स्थानकाचे रिमॉडेलिंग केले जाणार असून, फलाटांची लांबी वाढवून लांब पल्ल्याच्या गाड्यांची सुविधाही सुधारली जाणार ( Pune Railway Station )आहे.
Ganesh Maharaj Mohite : संगीत विशारद गणेश महाराज मोहिते यांचा शिष्यांकडून सत्कार
दरम्यान, पुणे-मुंबई दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आता रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग मोकळा करत, तळेगाव-उरळी आणि पुणे-सोलापूर विभागातील वाडी जंक्शनपर्यंत दुहेरी मार्गिकेचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व काही नियोजित वेळेत पार पडल्यास तळेगाव-उरळी बाह्यवळण दुहेरी मार्ग प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि उपनगरी भागातील प्रवाशांना प्रवासाचा एक नवा पर्याय मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प पुणे जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार ( Pune Railway Station ) आहे.