Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ‘पुणे दर्शन’ आणि ‘पर्यटन बस’ सेवेचा पुणेकर नागरिक, पर्यटक, भाविक व निसर्गप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, जून मध्ये या सेवेला विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे. या महिन्यात एकूण रुपये 6 लाख 48 हजार एवढे उत्पन्न मिळाल्याची माहिती पीएमपीएमएलकडून देण्यात आली असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई ठरली आहे. ही सेवा शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येते. तसेच, 15 ते 20 प्रवाशांचे बुकिंग असल्यास कोणत्याही दिवशी खास बस सोडली जाते, ही सोय देखील प्रवाशांसाठी अत्यंत आकर्षक ठरत आहे.
शहरातील कार्यालये, शाळा, कॉलेज, आयटी कंपन्या तसेच औद्योगिक क्षेत्रातील नोकरदारांना शनिवार व रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे या दिवशी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने वातानुकूलीत ई-बसेसद्वारे ही सेवा सुरु केली असून, प्रवास अधिक सुलभ, आरामदायी व माफक दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. या बससेवा विविध धार्मिक, ऐतिहासिक, पर्यटन व निसर्गरम्य स्थळांना भेट देणाऱ्या मार्गांवर चालवण्यात येतात. त्यामुळे पुण्याच्या उपनगरांपासून ग्रामीण भागातील मंदिरे, किल्ले, धरणे, तीर्थस्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
PCMC:पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पालखी सोहळ्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा गौरव स्वच्छतेची वारी उपक्रमांतर्गत ११ संस्थांना सन्मानपत्र प्रदान…
माहे जून २०२५ मध्ये ‘पुणे दर्शन’ सेवेचे उत्पन्न रुपये १ लाख ३५ हजार ५०० इतके तर ‘पर्यटन बस’ सेवेचे उत्पन्न रुपये ५ लाख १२ हजार ५०० इतके असून एकूण उत्पन्न रुपये ६ लाख ४८ हजार इतके झाले आहे. ही आकडेवारी पाहता, मागील महिन्यांच्या तुलनेत जून महिन्यात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट होते. उदाहरणार्थ, एप्रिल २०२५ मध्ये एकूण उत्पन्न केवळ १ लाख ५६ हजार होते, तर मे महिन्यात ते ४ लाख ७५ हजार रुपयांवर गेले. मात्र जून महिन्यात ते थेट ६.४८ लाखांवर पोहोचल्याने या सेवेला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते.
पुणे दर्शन व पर्यटन बस सेवेसाठी पीएमपीएमएलने विविध १० मार्ग निश्चित केले असून, त्यात मोरगाव, जेजुरी, सिंहगड पायथा, पुरंदर किल्ला, बालाजी मंदिर, निलकंठेश्वर, प्रतिशिर्डी, आळंदी, वडुबुद्रुक येथील संभाजी महाराज समाधी स्थळ, तुळापुर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, भिमा-कोरेगाव विजयस्तंभ आदी स्थळांचा समावेश आहे. काही मार्गांमध्ये निसर्गरम्य स्थळांबरोबरच ऐतिहासिक मंदिर व किल्ल्यांचा समावेश आहे, जे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. या बसेस पुणे स्टेशन, स्वारगेट, हडपसर व डेक्कन जिमखाना या मुख्य बसस्थानकांवरून सुरू होतात.
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के

महामंडळाकडून माहिती देण्यात आली आहे की, आषाढ व श्रावण महिन्यात भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पर्यटनप्रेमींनी या सेवांचा लाभ घ्यावा. कारण या काळात धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते आणि अनेक धार्मिक यात्रांचा हंगाम देखील याच महिन्यांत असतो. अशावेळी पुणे दर्शन व पर्यटन बस सेवा ही एक उत्तम व सुरक्षित पर्याय ठरू शकते.
शहरातील नागरिकांना घरबसल्या पुण्याजवळच्या ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणी माफक दरात जाण्याची सुविधा मिळावी हा हेतू या सेवेमागे असून, पीएमपीएमएलच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. उत्पन्नातील वाढ हे नागरिकांचा या सेवेवरील विश्वासाचे व समाधानाचे निदर्शक आहे. भविष्यात अशा आणखी मार्गांची भर टाकून ही सेवा अधिक व्यापक करण्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत.