बारामती परिमंडलाचे ‘राहिले दूर घर माझे’ द्वितीय
Team MyPuneCity – महावितरणच्या पुणे प्रादेशिकस्तरीय आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे पुणे परिमंडलाने ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. आता हे नाटक नाशिक येथील राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर बारामती परिमंडलाचे ‘राहिले दूर घर माझे’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचा बुधवारी (दि. ४) समारोप झाला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक श्री. दिनेश अग्रवाल व श्री. दत्तात्रेय पडळकर तसेच मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे (पुणे), श्री. स्वप्निल काटकर (कोल्हापूर) आणि श्री. धर्मराज पेठकर (बारामती) यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, रंगभूमीवर सादर होणारा अभिनय खऱ्या अर्थाने जिवंत असतो. तिथे रिटेकला स्थान नाही. महावितरणमधील कर्तव्य व जबाबदाऱ्या सांभाळून नाट्य कलांवतांनी व्यावसायिक नाटकाच्या तोडीचे नाटक सादर केले आहे. एखादी नाट्यकृती सादर करताना ती सांघिक कामाने अधिक प्रभावी होते, याचा प्रत्यय दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नवऊर्जा देणारी ही नाट्यस्पर्धा आहे असे गौरवोद्गार श्री. पवार यांनी काढले.
या नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलकडून अजित दळवी लिखित ‘डॉक्टर, तुम्हीसुद्धा!’, कोल्हापूर परिमंडलाकडून चं. प्र. देशपांडे लिखित ‘सामसूम’ तर बारामती परिमंडलद्वारे शफाअत खान लिखित ‘राहिले दूर घर माझे’ ही नाट्यकृती सादर करण्यात आली. या नाटकांना पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नाट्यपरीक्षक म्हणून अर्चना कुबेर, सुनील देवळीकर, ज्ञानेश्वर धमाळ यांनी काम पाहिले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्णव लिडबिडे, दीपश्री सरोदे, महेश कारंडे यांनी केले. आयोजन समितीचे सचिव व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.
नाट्यस्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे- उत्कृष्ट नाट्यनिर्मिती- प्रथम – मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे (पुणे) / द्वितीय – मुख्य अभियंता श्री. धर्मराज पेठकर (बारामती), दिग्दर्शन– प्रथम – ज्ञानदेव पडळकर (पुणे) / द्वितीय – सुनील माने (बारामती), अभिनय (पुरुष)- प्रथम- सचिन निकम (पुणे)/ द्वितीय – मंगेश कांबळे (कोल्हापूर), अभिनय (स्त्री)– प्रथम- सोनाली बावस्कर (पुणे)/ द्वितीय- सोनाली बेंद्रे (कोल्हापूर), नेपथ्य- प्रथम- सतीश सरोदे/अजय सुळे (पुणे) / द्वितीय- अप्पासाहेब पाटील/श्रीकांत सनगर (कोल्हापूर), प्रकाशयोजना- प्रथम- संदीप शेंडगे/उमेश करपे (पुणे)/ द्वितीय- मनीषकुमार सूर्यवंशी/ सुरेशचंद्र जोगी (बारामती), संगीत- प्रथम- राजेश मदने (बारामती) / द्वितीय- दीपक भोसले/नितीन सावर्डेकर (कोल्हापूर), रंगभूषा व वेशभूषा- प्रथम- शगुफ्ता मुजावर/ सुनंदा माशाळे (बारामती) / द्वितीय- निशिकांत राऊत/ संदीप कांबळे (पुणे). अभिनय उत्तेजनार्थ- भक्ती जोशी (पुणे), अंजली गुडूर (बारामती) व नझीर अहमद इलाही मुजावर (कोल्हापूर).