महाराष्ट्रीय कलोपासकच्या ‘कलोपासकांचे आख्यान’ पुस्तकाचे प्रकाशन
Team Pune City –महाराष्ट्रीय कलोपासकच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये(Pune) भाग घेणे हा नाटक शिकण्याचा पाया आहे. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यानंतर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे महत्त्व कळले. पुण्यातून रंगभूमीला मिळालेल्या कलाकारांमधून अर्ध्याहून अधिक कलाकार पुरुषोत्तमच्या मांडवाखालून गेलेलेे आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी काढले.
महाराष्ट्रीय कलोपासकची 90 वर्षे आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या 60 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या ‘कलोपासकांचे आख्यान’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 9) सुहास जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. रंगभूमीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे, महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, पुस्तकाचे लेखक शामराव जोशी, गोपाळ जोशी, डॉ. स्वाती महाळंक, पुस्तकाचे संपादक मिलिंद सबनीस, भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे मंचावर होते. भरत नाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Chakan Crime News: सराईत चोराकडून 8.25 लाखांच्या 15 चोरीच्या मोटारसायकली जप्त, 16 गुन्ह्यांची उकल
Talegaon MIDC : तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये उत्साहात रक्षाबंधन सण साजरा!
सुहास जोशी पुढे म्हणाल्या, 1964 सालच्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत मी सहभागी झाले होते. त्या काळात पुण्यातील सगळे नाटकवाले विद्यार्थी स्पर्धेला आवर्जून हजर असत. स्पर्धेत भाग घेण्याव्यतिरिक्त इतर संघांनी सादर केलेली नाटके बघणे, प्रतिस्पर्धी काय ताकदीचा आहे हे ओळखून आपली तयारी करणे हे आम्हा सर्वांसाठीच आव्हानात्मक व आनंददायी होते. पुरुषोत्तमच्या माध्यमातून हजारो कलाकार निर्माण झाले आहेत. कलोपासकच्या माध्यमातून रंगमांचावर स्पॉट लाईटची संकल्पना राजाभाऊ नातू यांनी पुढे आणली हे मला आजच समजले. परंतु ते या क्षेत्रातील अतिशय कुशल जादूगारच होते याचा अनुभव आम्ही कलाकारांनी अनेकवेळा घेतला आहे. महाराष्ट्रीय कलोपासकच्या शंभराव्या वर्षात नक्की येईन, असेही त्यांनी आनंदाने सांगितले.
‘भरत’सारखा प्रयोग कुठेही रंगत नाही …
भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावर अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाट्य प्रयोग केले आहेत याचा आवर्जून उल्लेख करून सुहास जोशी म्हणाल्या, भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावर रंगतो तसा प्रयोग पुण्यातील कुठल्याही रंगमंदिरात रंगत नाही. याचे कारण काय ते माहिती नाही. प्रेक्षक रंगमंचाच्या अगदी जवळ असतात की, पुण्यातील इथे येणारे प्रेक्षक सुजाण सदाशिव-नारायण पेठेतील असतात?
कलोपासक म्हणजे विश्रब्ध रंगावकाश : डॉ. श्यामला वनारसे
कलोपासक आणि पुरुषोत्तम स्पर्धेच्या वाटचालीचा आढावा घेऊन डॉ. श्यामला वनारसे म्हणाल्या, कलोपासक म्हणजे विश्रब्ध रंगावकाश आहे. इथे येऊन अनेक कलाकार कर्ते, यशस्वी आणि कीर्तीमान झाले आहेत. कलोपासक हा संस्थात्मक कामाचा भक्कम पाया आहे. रंगभूमीचे बाजारीकरण होत असताना समाजात सांस्कृतिक जाण निर्माण करण्याचे कार्य कलोपासकच्या माध्यमातून होत आहे. नाटकाने जीव धरण्यासाठी कलोपासकसारखी संस्था ताकद देत आहे. कलोपासकची संस्थात्मक, सामाजिक आणि मानसिक भूमिका मांडणारा इतिहास अजून जास्त प्रमाणात समाजासमोर यावा. वयोमानपरत्वे या सोहळ्यासाठी रंगमंचावर येणे शक्य नव्हते तरी कलोपासकमधील व्यक्ती रंगमंचावर न जाताही काय करत आहेत याला दाद देण्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहिले आहे.
मिलिंद सबनीस यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले तर गोपाळ जोशी यांनी लेखनप्रवासाचा धावता आढावा घेतला. रवींद्र खरे यांनी भरत नाट्य संशोधन मंदिर आणि महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थांचा अनुबंध उलगडला. मान्यवरांचे स्वागत डॉ. सुहास जोशी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अवंती लोहकरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रीय कलोपासकची आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्याशी श्यामराव जोशी आणि सुरभी नातू यांनी संवाद साधला.