धर्मदाय आयुक्त, मुबंई यांच्याकडे तातडीची सुनावणी : आवारात मंदिर आहे की नाही पाहण्याचे सहधर्मदाय आयुक्तांना निर्देश
Team My Pune City –मॉडेल कॉलनी परिसरातील पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत (Pune) असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या (जैन बोर्डिंग) जागेच्या विक्रीव्यवहाराला धर्मदाय आयुक्त, मुंबई यांनी स्थगिती दिली असून पुढील आदेशापर्यंत व्यवहार जैसे थे ठेवण्याबरोबरच जैन बोर्डिंगच्या आवारात मंदिर आहे की नाही याची पाहणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगची (जैन बोर्डिंग) जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकली असा आरोप करत जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने आज (दि. 20) धर्मदाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी, अशी याचिका ॲड. सुकौशल जिंतूरकर, ॲड. योगेश पांडे, लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन, प्रशांत बज यांनी धर्मदाय आयुक्त अमोल कलोटी यांच्याकडे दाखल केली होती. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने ॲड. पांडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली.
जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी शासनाची फसवणूक करून खोट्या कागदपत्रांद्वारे चुकीच्या पद्धतीने जागा विक्रीसंदर्भात धर्मदाय आयुक्तांकडून आदेश प्राप्त करून घेतला होता. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. जैन बोर्डिंगच्या जागेत मंदिर नाही, असे कागदपत्रांद्वारे दाखविण्यात आले होते, त्यावर बुलडाणा अर्बन आणि गिरेश्वर क्रेडिट सोसायटीचा बोजा चढविण्यात आला होता. त्यामुळे हे मंदिर नेमके कोणाचे याविषयीही आज सुनावणी घेण्यात आली. या व्यवहाराची राज्य सरकारच्या वतीने धर्मदाय आयुक्तांनी दखल घेतली असून त्याविषयी येत्या 28 तारखेपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश धर्मदाय सहआयुक्त पुणे यांना देण्यात आले आहेत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मंदिर आहे की नाही हे तपासण्याचेही निर्देश दिलेले आहेत. ट्रस्टद्वारे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये, महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये कुठेही मंदिराचा उल्लेख नाही. त्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे, असे मत नोंदवले आहे. येत्या 28 तारखेला या विषयी सुनावणी होणार आहे, अशी माहिती ॲड. योगेश पांडे यांनी दिली.
Wanawadi Police : वानवडी पोलिसांकडून कोंबड्यांच्या झुंजींवर धाड – सहा जणांना अटक, सुमारे ५ लाख ११ हजारांचा मुद्देमाल जप्त
Pune Metro : लक्ष्मीपूजेनिमित्त पुणे मेट्रोच्या सेवा वेळेत बदल; मंगळवारी सायंकाळी सहानंतर सेवा बंद
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला.. लक्ष्मीकांत खाबिया
जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. जैन समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. याची प्रचिती आजच्या घटनाक्रमावरून आली आहे. महाराष्ट्रातील जैन समाज मुख्यमंत्र्यांचे आभार मानत आहे. जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या लढ्याचा हा पहिला टप्पा आहे. भविष्यात अनेक लढाया लढायच्या आहेत. भविष्यातही मुख्यमंत्र्यांची साथ लागणार आहे, अशा भावना कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या आहेत. जमीन विक्री प्रकरणासंदर्भात मंत्री, राजकीय पक्ष यांच्याविषयी जैन समाजाला आकस नाही. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिहिर कुलकर्णी यांची या प्रकरणात मोठी मदत झाली.