अजित दादांनी विद्यार्थ्यांना दिली “मातृनाम प्रथमची शपथ”
यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने “मातृनाम प्रथम शपथ ग्रहण सोहळा” संपन्न
Team MyPuneCity –’जन्माला येणारा प्रत्येक जण पहिल्यांदा आई, मा किंवा आता मम्मी म्हणतो ही आपली संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राला मातृशक्तीची गौरवशाली परंपरा आहे. मात्र अलिकडच्या काळात अनेकांची मुलं, सून मुली, जावई या परदेशात आहेत. दुर्दैवाने हे लोक आपल्या आई-वडिलांना विसरून जातात परदेशात गेल्यानंतर आई किंवा वडील आपल्यातून निघून गेले तर ते व्हिडीओ कॉलवरून अंत्यविधीचा कार्यक्रम करतात हे दुर्दैव आहे. त्यामुळे नाईलाजाने आता आम्हाला वृद्धाश्रम काढावे लागत आहे, हे खरच दुर्दैवी आहे.’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने जागतिक मातृदिनानिमित्त आयोजित “मातृनाम प्रथम शपथ ग्रहण” सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
पुण्यातील यशवंत क्लासेसच्या वतीने मातृनाम प्रथम शपथ ग्रहण समारंभ हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु आहे. दरवर्षी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने यशवंत क्लासेस यांच्यावतीने “मातृनाम प्रथम” या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. यावेळी यशवंत क्लासेसचे संस्थापक प्रा. शीतल नलिनी आदगौडा पाटील, राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, यशवंत क्लासेसच्या संचालिका उज्वला विमल शीतल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन उज्वला शीतल पाटील, संचालक आदित्य उज्वला शीतल पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि यशवंत क्लासेसचे ब्रँड अँबेसिडर संकर्षण कऱ्हाडे यांनी त्यांच्या “आई” या कवितेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी आई विषयी हितगुज केले. क्लासेसच्या १० वी च्या गुणवंत विद्यार्थी आणि मातांचा सत्कार अजितदादा यांच्या हस्ते झाला.

अजित पवार म्हणाले की, आपल्या सर्वांना आईने घडवले आहे. म्हणून आपल्या नावासमोर आईच नाव घेण्याचा कायदा आमच्या सरकारने आणला आहे. त्यासोबतच महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण आपण दिले आहे. जर स्त्री चूल आणि मूल, घर संभाळू शकते तर ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते, असा विश्वास आम्हाला आहे. म्हणून राजकारणात हे महिला आरक्षण आरक्षण आणले आहे, असे म्हणत अजित पवार यांनी महिला आरक्षण बिल पास करत असतानाचा शरद पवार साहेबांचा “तो” किस्सा सांगितला.

शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणले, पवार साहेबांनी सांगितलं होतं की हे बिल मंजूर होइपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील. मला आठवते की सभागृह चार वाजेपर्यंत चालवले आणि महिला आरक्षणाचे बिल शरद पवार साहेबांनी मंजूर करून घेतले. यावेळी साहेबांनी ठणकावून सांगितले की आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे अन् हे बिल साहेब मुख्यमंत्री असताना पास झाले, असे अजित पवार यांनी सांगितले.
Pune Crime News 17 May 2025 : सिटिझन ट्रेडिंग बँकेजवळ इसमाच्या मोबाईलची जबरी चोरी
रोज आम्ही नाटक करतो
अजित पवार म्हणाले, अभिनेता संकर्षण कराडे यांनी सांगितले की, दादा मी एक नवीन नाटक काढले आहे. त्याचा पन्नासावा प्रयोग बघायला या, मी त्याला म्हटले की आता रोज आम्ही नाटक करत असतो. मला काय नाटक दाखवणार? असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकाला.
अजित दादांनी विद्यार्थ्यांना दिली “मातृनाम प्रथमची शपथ”
उपमुख्यमंत्री पदाची सहाव्यांदा शपथ घेतलेल्या अजित दादा पवारांनी आज सातव्यांदा शपथ घेतली. यावेळी सभागृहातील उपस्थित विद्यार्थी व पालकांनी दादांबरोबर मातृनाम प्रथमची शपथ घेतली. आईचे नाव सर्व शासकीय कागदपत्रात लावायचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल समस्त विद्यार्थी आणि मातांच्या वतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि कृतज्ञता सन्मानिका अर्पण सोहळा यावेळी पार पडला.