Team MyPuneCity – आंबेगाव बुद्रुक परिसरातील सर्व्हिस रोडवर एका ३१ वर्षीय विवाहित महिलेचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिला प्रीती सचिन वखारे (वय ३१, रा. हिवरे तर्फ आंबेगाव, पुणे) असे तिचे नाव असून, ही घटना २० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर प्रीती वखारे या पायी जात असताना, अज्ञात इसमाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्या रस्त्यावर कोसळल्या. परिसरातील नागरिकांनी याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी तातडीने प्रीती यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
Pune: धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला, त्यांना मनःशांती मिळेल- पंकजा मुंडे
प्रीती वखारे या विवाहित असून, त्या काही दिवसांपासून माहेरी राहत होत्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीने हत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तपास वेगाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम करीत आहेत.