Team My Pune City – “गणपती बाप्पा मोरया, (Pune)पुढच्या वर्षी लवकर या” या गजरात पुण्यातील सात दिवसांचा गणेशोत्सव विसर्जनाने संपन्न झाला. केवळ मंगळवारी (दि. 2 सप्टेंबर) तब्बल 18 हजार 771 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत एकूण 71 हजार 573 मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले की, मंगळवारीच नागरिकांनी 22 हजार 319 किलो निर्माल्य जमा केले. सात दिवसांच्या कालावधीत एकूण 79 हजार 994 किलो निर्माल्य संकलित झाले असून, त्यात सर्वाधिक 9 हजार 200 किलो कोथरूड-बावधन विभागातून जमा झाले.
महापालिकेच्या पर्यावरणपूरक सोयी
यंदा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महापालिकेने शहरभर 38 कृत्रिम विसर्जन टाक्या, 648 लोखंडी टाक्या, 338निर्माल्य कलश आणि 241 मूर्तीदान केंद्रांची सोय केली होती. याशिवाय 15 प्रमुख घाटांवर अग्निशमन दल, जलतरणपटू, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिस यांची चोवीस तास तैनाती करण्यात आली. नागरिकांना नदीत विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम टाक्या व दान केंद्रांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
विसर्जनाचे आकडे
मंगळवारी २,११८ मूर्ती कृत्रिम टाक्यांत विसर्जित
१०,९१८ मूर्ती लोखंडी टाक्यांत विसर्जित
५,७३५ मूर्ती दान केंद्रांत जमा
एकूण सात दिवसांत ७१,५७३ मूर्तींचे विसर्जन
त्यापैकी ११,०६९ कृत्रिम टाक्यांत, ४२,३९४ लोखंडी टाक्यांत तर १८,११० मूर्ती दान केंद्रांत जमा
स्वच्छता व नागरिकांचे सहकार्य
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, यावर्षी नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे नदीप्रदूषण टळून हरित आणि स्वच्छ गणेशोत्सव साजरा करण्यास मदत झाली. “नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक ठरला,” असे प्रशासनाने स्पष्ट केले.