Team My Pune City -लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्या (Pune)सदस्यांनी माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव पाटील तसेच पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे यांची पुणे म्हाडा कार्यालयात सविस्तर भेट घेतली. यावेळी सुमारे कृती समितीचे सुमारे ५० सदस्य हजर होते.
१७ ऑगस्ट २०२५ रोजी पुनर्विकास प्रकल्प स्थगितीविरोधात लोकमान्यनगरमध्ये झालेल्या यशस्वी आंदोलनाची दखल घेऊन आढळराव पाटील यांनीच भेटीचा प्रस्ताव मांडला होता. भेटीदरम्यान लोकमान्यनगरमधील गेली अनेक वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत, इमारतींच्या दुरवस्थेबाबत अध्यक्षांना पूर्ण कल्पना देण्यात आली. बांधकाम ढासळत चाललेल्या इमारतींचे फोटो दाखवण्यात आले. अनेक रहिवाशांनी प्रत्यक्ष आपलं गाऱ्हाणं मांडलं. पुनर्विकास प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर असलेल्या सर्व सोसायट्यांसमोर या स्थगितीने फार मोठी अडचण उभी केली असून एकत्रित पुनर्विकासाच्या हट्टापायी सर्वच रहिवाशांचं अपरिमित नुकसान होणार आहे हे अध्यक्षांना सांगण्यात आलं. इमारतींची अवस्था बिकट असल्याने उद्या दुर्दैवाने जर काही दुर्घटना घडली आणि जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी पुनर्विकास प्रक्रियेत खीळ घालणाऱ्या सर्वांची असेल असं समितीने स्पष्टपणे अध्यक्षांच्या कानावर घातलं.
Ajit Pawa: पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
या संदर्भात समिती सदस्यांच्या सहीने एक सविस्तर निवेदन अध्यक्षांना देण्यात आलं. कृती समिती इथून पुढे शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करून आपला संघर्ष सुरू ठेवणार आहेच; पण या संघर्षाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्व संबंधितांची भेट घेणार आहोत असं समितीने स्पष्ट केलं. पुढील आठवड्यात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करू असं आश्वासन आढळराव पाटील यांनी कृती समितीला दिलं आहे.

शासनाकडून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पुनर्विकास स्थगिती उठवण्याबाबत लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. पण लोकमान्यनगरवासियांचा हा संघर्ष त्यांच्या राहत्या घरासाठीचा, त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठीचा संघर्ष आहे. त्यामुळे तशीच वेळ आली तर आता आम्ही मागे हटणार नाही, हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार सर्व समिती सदस्यांनी या भेटीनंतर जाहीर केला.