भारतीय सैन्य आणि यशदाचा संयुक्त उपक्रम
Team MyPuneCity – भारतीय सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाच्या मार्गदर्शनाखाली, औंध मिलिटरी स्टेशनवरील ‘फॉरेन ट्रेनिंग अॅण्ड मिलिटरी-सिव्हिल फ्युजन ट्रेनिंग नोड’ येथे राज्य शासनाच्या १६१ गट-अ अधिकाऱ्यांनी सैनिकी पद्धतीवर आधारित ( Pune) नेतृत्व व संकट व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. या सात दिवसीय विशेष प्रशिक्षणाचा समारोप १० जून २०२५ रोजी झाला.
या प्रशिक्षणात उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, राज्य कर सहआयुक्त, गटविकास अधिकारी यांसह विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या (यशदा) सहकार्याने राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षणाने नागरी आणि लष्करी यंत्रणांतील सहकार्याचा नवा आदर्श उभा केला आहे.
दि. ४ जून ते १० जूनदरम्यान पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश नेतृत्वगुण, आंतरविभागीय समन्वय आणि आपत्कालीन परिस्थितीतील निर्णायक क्षमतेचा विकास करणे हा होता. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना बंदुकीचे प्रात्यक्षिक, खडकावर चढाई, खोली हस्तक्षेप (रूम इंटरव्हेन्शन), जंगलात टिकून राहण्याच्या (जंगल सर्व्हायव्हल) कसरती अशा थेट कृतीतून प्रशिक्षण देण्यात आले. या सत्रांद्वारे शिस्त, टीमवर्क आणि रणनीती आधारित समस्या सोडवण्यावर ( Pune) विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. या संवादातून अधिकाऱ्यांना लष्करी संचालनाची अंतर्गत रणनीती समजली आणि त्याचा उपयोग सार्वजनिक सेवा अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमामुळे राज्य प्रशासनाच्या नेतृत्व विकासाची दिशा अधिक बळकट झाली असून, राज्य शासनाच्या चांगल्या प्रशासन व शाश्वत विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे ठोस उदाहरण ठरले आहे. सहभागी अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणामुळे त्यांच्या नेतृत्व आणि संकट हाताळणी क्षमतेत झालेल्या सकारात्मक बदलांविषयी समाधान व्यक्त केले आणि भारतीय सैन्याच्या या प्रयोगशील उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय लष्कर व राज्य प्रशासन यांच्यातील सहकार्याची ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली असून, यासारखे उपक्रम भविष्यातही राज्यभर राबविले जातील, अशी ( Pune) अपेक्षा आहे.


















