न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन
Team My Pune City –न्यायदानाचे काम सोपे नसते. विविध रूढी, परंपरा, (Pune)प्रथा यातून व्यक्तीची मानसिक धारणा तयार होते. परंतु न्यायासनावर बसल्यावर सर्व धारणा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावे लागते. अशा वेळी निर्णय घेताना अध्यात्माची जोड मिळाल्यास निर्णय घेणे सोपे जाते, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी केले. संतवाङ्मयावर आधारित बंडोपंत कुलकर्णी यांच्या पुस्तकांचा समाज व अभ्यासकांना निश्चित फायदा होईल, अशी टीप्पणही त्यांनी केली.
अनुबंध प्रकाशन प्रकाशित आणि न्यायाधीश बंडोपंत कुलकर्णी लिखित ‘मुक्तांची अभंग वाट’ आणि ‘ज्ञाना तू का जनी निळा, नामी गोरा?’ या पुस्तकांचे प्रकाशन न्यायमूर्ती एन. के. जमादार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी न्यायमूर्ती एन. के. जमादार बोलत होते. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाशक अनिल कुलकर्णी मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रविवारी (दि. १७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलताना न्यायमूर्ती एन. के. जमादार यांनी बंडोपंत कुलकर्णी यांच्याशी बालपणापासून असलेला स्नेहबंध उलगडून दाखविला.
लेखनाविषयी बोलताना बंडोपंत कुलकर्णी म्हणाले, न्यायदानाच्या क्षेत्रात काम करत असताना गुरूंच्या आदेशाने मी अध्यात्माकडे वळलो त्यातूनच लिहिता झालो. संत साहित्याच्या शोधातून वाचन, साधना आणि अभ्यास या मार्गातून जे उमगले ते कागदावर उतरविले.
संगीता बंडोपंत कुलकर्णी यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
अनुबंध प्रकाशन संस्थेविषयी माहिती देत अनिल कुलकर्णी यांनी पुस्तकांच्या निर्मितीविषयी अवगत केले.
Vadgaon Maval: वारंगवाडीत परंपरागत गोकुळाष्टमी साजरी
Pimpri Chinchwad Crime News 17 August 2025 : तलाक न दिल्याने महिलेवर खुनी हल्ला
अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हा न्यायाधीश एस. के. महाजन म्हणाले, संत साहित्य हे आयुष्यात वाटचाल कशी करावी या विषयी मार्गदर्शन करते. संसारात राहून कर्तव्यपूर्ती केली म्हणजे हरिनाम जपणे होय. बंडोपंत कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके वाचकांना मार्गदर्शक ठरतील.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, संत साहित्याचा योग्य तो अर्थ समाजापर्यंत पोहोचावा या हेतूने बंडोपंत कुलकर्णी अभ्यास, मनन, चिंतनातून लिहिते झाले आहेत. त्यांचे लिखाण स्वानुभूतीवर आधारित आहे. आपले अनुभव संतांच्या साहित्यातून पडताळून पाहत झालेले लिखाण उपयुक्त आहे. न्यायाधीशांना अध्यात्माची बैठक असणे आवश्यक आहे. संसाराची व्याख्या मर्यादेत बांधली गेली आहे, परंतु संतांच्या मते विशिष्ट पद्धतीने संसार करणे हाच परमार्थ आहे. अनेक न्यायमूर्ती व न्यायाधीशांनी उत्तममोत्तम साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळोवेळी संतसाहित्याचा अभ्यास केला आहे. ‘ठेवीले अनंते तैसेची रहावे’ ही ओवी बंडोपंत कुलकर्णी यांच्या लिखाणाचा आद्य प्रारंभबिंदू ठरली आहे. संत साहित्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांच्याकडे असून त्यांनी सगुण-निर्गुण द्वंद्वाचे उत्तम विवेचन केले आहे.
डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. डुंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. दीपक डोंगरे, ॲड. आशिष कंकाळ यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.