रंगत-संगत प्रतिष्ठान, आम्ही एकपात्रीतर्फे पहिल्या वंदन राम नगरकर पुरस्काराचे वितरण
प्रतिसादातून कलाकारांचे जुळते रसिकांशी नाते : नितीन कुलकर्णी
Team MyPuneCity –पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते. जो ‘पुरे साकार’ करतो त्याला पुरस्कार दिला जातो. मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे. कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांच्या मनापर्यंत गेले की, रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यातूनच कलाकार आणि रसिक यांचे नाते जुळते, असे मत कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने नितीन कुलकर्णी यांचा आज (दि. 18) गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानचिन्ह, ग्रंथ आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बण्डा जोशी आणि नितीन कुलकर्णी यांनी ‘हास्यवंदन’ हा कार्यक्रम सादर केला. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
सादरीकरण करताना विनोदी कलाकार माळेमध्ये फुले ओवल्याप्रमाणे प्रसंग ओवत जातो आणि सादरीकरण अधिक मनोरंजक करतो, असे सांगून नितीन कुलकर्णी म्हणाले, कलाकराला रसिकांची रंगत-संगत मिळत गेली की कलाकाराचा कार्यक्रम बहरत जातो. त्याला रंगदेवतेची प्रेरणा असणे आवश्यक असते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बण्डा जोशी म्हणाले, माणूस खळखळून हसतो तेव्हा तो सुंदर दिसतो आणि हा सुंदर माणूस पाहण्याचे भाग्य आम्हा हास्य कलाकारांना लाभते. रसिकांना हसवायचे काम जरी आम्ही कलाकार सातत्याने करत असलो तरी आम्हा कलाकारांना या विषयी गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. सगळ्या कलांचा संगम असलेला, विनोदाची पातळी सांभाळणारा एकपात्री कलाकार उत्तम ठरतो.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, वंदन राम नगरकर हे फक्त कलावंत नव्हे तर उत्तम माणूसही होते. त्यांनी आपल्या कलेची समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सकारात्मक काम करण्याच्या ओढीने आम्ही सतत कार्यरत आहोत.
Pune: संवेदना, जाणिवा प्रगल्भ झाल्यास आदिवासी संस्कृती टिकेल-पंडित विद्यासागर
डॉ. वैजयंती नगरकर म्हणाल्या, हास्य कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांच्या मेंदूमध्ये अशी रासायनिक प्रक्रिया निर्माण करतो की ज्यातून त्याचे मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते. वंदन नगरकर यांचे पहिले प्रेम हे एकपात्री कलाच होते. त्यांनी रुजविलेले आम्ही एकपात्री संस्थेचे बीज आणि त्यातून निर्माण झालेला वृक्ष त्यांच्या पश्चात इतर कलाकार उत्तमरित्या सांभाळत आहेत याचा आनंद आहे.
मानपत्राचे वाचन अनुपमा खरे यांनी केले. सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी तर आभार मिता मुधाळे यांनी मानले.