Team MyPuneCity -महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या प्रदेश व जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक अलीकडेच पुण्यात संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच सक्षमीकरणासाठी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीचा प्रमुख केंद्रबिंदू ब्राह्मण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर होता. महिलांनी उद्योजिकेच्या भूमिकेत यावे, यासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्याकडून तयार होणाऱ्या उत्पादनांना व सेवांना बाजारपेठ मिळवून देणे आणि समाजात त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, या दिशेने काम करण्याचे ठरवण्यात आले. महिलांचे आर्थिक स्वावलंबन हा समाजाच्या एकूणच विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता समाजातील तरुणांनी स्टार्टअप आणि नवउद्योजकतेकडे वळण्याचा. युवा पिढीने नव्या कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन, संसाधने आणि संपर्क उपलब्ध करून देण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. नवतरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू करून रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावावी, यावर भर देण्यात आला.
Chinchwad: प्रतिभा महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
तिसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर सखोल चर्चा झाली. समाजहितासाठी कार्य करणाऱ्या, निःस्वार्थ नेतृत्वगुण असलेल्या व्यक्तींना राजकीय प्रवाहात आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली. राजकीय स्तरावर समाजाचा योग्य सहभाग असावा, यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली.
या बैठकीदरम्यान ठरवण्यात आले की, वरील सर्व बाबींवर कृतीशील उपाययोजना लवकरच राबवण्यात येतील. समाजाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे निर्धार या बैठकीत सर्वांनी व्यक्त केला.