Team My Pune City – रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) (Pune)पुणे विभागात राबविलेल्या ‘ऑपरेशन सतर्क’ विशेष मोहिमेत मोठी कारवाई करत तब्बल 51 लाख रुपयांची अवैध रोकड जप्त केली आहे. ही कारवाई पुणे रेल्वे स्थानकावरील मुख्य फूट ओव्हरब्रिजजवळ (पीआरएस बाजू) सोमवारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएसएफ सुरक्षा रक्षक कृष्णा दिलीप भांगे हे बॅगेज तपासणीचे काम पाहत असताना, एका प्रवाशाच्या पिशवीत संशयास्पद रोख रकमेचे बंडल आढळून आले. चौकशीदरम्यान तो प्रवासी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, तेथील तैनात आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी – एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभये, एएसआय विलास दराडे व एएसआय/एमएसएफ संतोष पवार यांनी तत्परतेने धाव घेऊन त्याला पकडले.
Pune: ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२५ – २७ सप्टेंबरला; विद्यार्थी व पालकांसाठी मोफत प्रवेश
Talegaon Dabhade: मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदाही कृष्णराव भेगडे स्कूलच्या मुली अव्वल
पुढील तपासासाठी त्याला आरपीएफ ठाणे, पुणे येथे आणण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव फरदीनखान जफरुल्ला खान मोगल (वय 24, रा. मोगलवस, वारवडा गाव, मेहसाणा जिल्हा, गुजरात) असे सांगितले. त्याच्याकडे एवढी मोठी रोख रक्कम का आहे याचे समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही.
यानंतर इनकम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोख रकमेची मोजणी करण्यात आली. त्यात दोन बॅगांमधून एकूण 51लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये एका बॅगेत मिश्र नोटा स्वरूपात 22 लाख रुपये तर दुसऱ्या बॅगेत 500 रुपयांच्या नोटा स्वरूपात 29 लाख रुपये आढळून आले.
ही जप्त रक्कम व संशयित प्रवासी यांना पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आयकर विभाग, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने अशा कारवायांमधून रेल्वे मार्गावर होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर प्रभावी नियंत्रण आणले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.