Team My Pune City –प्रार्थना, भजन, कन्या पूजन, सुहासिनी पूजन, श्री सुक्त हवन, (Pune)रामनामतारक मंत्र हवन, तुलभारसेवा, कुंकुमार्चन, दीपलंकार सेवा, रामनाम पठण, रात्री भजन यांसह गायन, वादन आणि नृत्याविष्काराने परिपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमासह जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणेतर्फे शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांना पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात शारदोत्सव आयोजित करण्यात येतो. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष होते. शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमांसह रसिकांनी भक्तीभावपूर्ण वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांची अनुभूती घेतली. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांनी ‘भक्ती सुधा’ कार्यक्रमात भक्तीगीते, भजने सादर करून भक्तीभावपूर्ण वातावरणाची निर्मिती केली. स्वाती भारतानंद सरस्वती महाराज यांचे वारकरी कीर्तन रंगले. स्वर नाद या कार्यक्रमात विनय राव यांनी विविध वाद्यांवर सुमधुर वादन केले. तर भक्ती सुमन कार्यक्रमात पंडित सुरेश पत्की यांनी भक्ती गीते सादर केली.
Pune: ‘स्वरयज्ञ’ महोत्सवातून रसिकांना सांगीतिक भेट
Talegaon Dabhade: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्तेची सांगड घालणे विद्यार्थ्यांची जबाबदारी- पंकज फणसे

देवी स्वरांजली कार्यक्रमात संयुक्त कोंकणी सभा श्रीराम भजनी मंडळातर्फे देवी स्तुतीपर भजने सादर करण्यात आली. प्रमदवरा कित्तूर यांच्या शिष्यांनी त्रिदेवी सूक्त या अंतर्गत देवीच्या विविध रूपांचे मनमोहक दर्शन घडविले.
दिव्या शेणवी मौजेकर यांची कीर्तन सेवा सादर झाली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज श्रीनिवास जोशी यांचे सुमधुर गायन झाले. त्यांनी सादर केलेल्या संगीत सेवेतून भक्ती तरंगाची अनोखी अनुभूती आली. आपल्या आजोबांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आपले पाय रोवण्यासाठी या समाजाने बहुमोल मदत केली आहे, असे सांगून पुढच्या वर्षी वडिल श्रीनिवास जोशी यांच्यासह या महोत्सवात हजेरी लावू असे आश्वासन दिले. कदंबवन फाऊंडेशनतर्फे राजवर्धन के. आणि समूहाने कलरी थिएटरीकलच्या माध्यमातून आदिमायेची विविध रूपे उलगडून दाखविली. कलाकारांचे सादरीकरण रसिकांना रोमांचित करणारे ठरले.
बस्ती कविता शेणॉय यांनी भक्ती मंजिरी या कार्यक्रमात देवीकृपेची विविध गीते सादर करून वातावरणात भक्तीभय लहरी निर्माण केल्या.