गझलविधा समूह, करम नियोजन समितीतर्फे ‘गझलविधा’ गझलसंग्रहाचे प्रकाशन
Team My Pune City -गझलकार घडवायचे की संपवायचे अशी कंठाळी चर्चा होत (Pune)असताना गझलविधा या गझल संग्रहातून सकारात्मक दिशा देणारे कार्य घडत आहे. आज नकारात्मकतेचा सूर फक्त मराठी गझल क्षेत्रातच नव्हे तर राजकारण, समाजकारण या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामुळे सकारात्मकता झाकोळली जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझल अभ्यासक डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी केले.
गझलविधा समूह आणि करम नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील निवडक गझलकारांच्या दर्जेदार गझलांचा समावेश असलेल्या ‘गझलविधा’ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवारी (दि. 21) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. अविनाश सांगोलेकर बोलत होते. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर अध्यक्षस्थानी होते तर करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, गझलविधा समूह संस्थापक शाम खामकर, प्रकाशक दास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Pune: भाऊसाहेब पाटणकर यांच्या जिंदादिल शेरोशायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचे प्रभावी सादरीकरण
Talegaon Dabhade: शिक्षक हे पिढी घडवण्याचे काम करतात-चंद्रकांत शेटे
भूषण कटककर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी भूमिका व्यक्त करताना सांगितले की, ‘एल्गार’ या 500 गझलकारांच्या समूहातून गझलसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यातूनच पुढे गझलविधा हा समूह निर्माण झाला. गझलविधा या पुस्तकातून मौल्यवान लेख आणि अनेक गझला रसिकांसमोर येणार आहेत.
डॉ. सांगोलेकर पुढे म्हणाले, गझलविधा पुस्तकाद्वारे 112 गझलकारांच्या रचना आणि 16 अभ्यासपूर्ण लेख वाचकांसमोर येत आहेत.
अध्यक्षपदावरून बोलताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, गझलविधा या पुस्तकाचे अंतरंग, त्यातील लेख आणि गझला उत्तम आहेत. हा एक प्रातिनिधिक गझल संग्रह असून याद्वारे महाराष्ट्रातील अनेक गझलकारांच्या रचना समाजासमोर आल्या आहेत. गझल हा साहित्यप्रकार श्रेष्ठ असून गझलकार म्हणजे ईश्वराला पडलेले स्वप्नच होय. गझलेच्या माध्यमातून मोठा आशय अल्पशब्दात व्यक्त करता येतो. गझल मनाच्या अंतरंगातून उमटत जाते.
प्रास्ताविकात शाम खामकर म्हणाले, आजचा काळ, समाजमाध्यमे, वातावरण विशुद्ध नाही. अशा काळात गझलविधासारखा मौलिक ग्रंथ प्रकाशित होत आहे ही आश्वासक घटना आहे. या पुस्तकात असलेल्या गझलांद्वारे काळाचा लेखाजोखा समर्थपणे मांडला गेला आहे.
‘तरही गझल’ या स्पर्धेतील विजेत्यांचा या वेळी पारितोषिक देऊन गौरव करण्यात अला. जनार्दन म्हात्रे, प्राजक्ता पटवर्धन, प्रमोद खराडे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, वैजयंती आपटे, अमिता पैठणकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचा मुशायरा आयोजित करण्यात आला होता. तीन सत्रात झालेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी यांनी केले. आभार मुक्ता भुजबले यांनी मानले.
फोटो ओळ : गझलविधा या प्रातिनिधिक गझलसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) दास पाटील, डॉ. अविनाश सांगोलेकर, ॲड. प्रमोद आडकर, भूषण कटककर, शाम खामकर.