Team My Pune City –विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी (Pune)आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे समाजोपयोगी कार्य घडेल, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा सेवक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज (दि. 17) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी, ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर, औसा नाथ संस्थानचे (जि. लातूर) पाचवे पीठाधीश गुरूबाबा औसेकर महाराज, कार्याध्यक्ष दिनेश सास्तुरकर आदी व्यासपीठावर होते.
Pune: परप्रांतियांचा मुंबईत मराठी भाषेला विरोध अयोग्यच – विश्वास पाटील
Pimpaloli Crime News : पिंपळोली येथे रिक्षा चालकाला किरकोळ कारणावरून मारहाण
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (आरोग्य), डॉ. दिनकरराव मोरे (जलसंवर्धन आणि पर्यावरण), राजेंद्र डहाळे (प्रशासकीय सेवा), ह.भ.प. नारायण महाराज पालमकर (अध्यात्म), सुभाष देशपांडे (संतसाहित्य), देविदास पाठक (पत्रकारिता), धनंजय जोशी (गायन), महादेव जगताप (सामाजिक सुरक्षा), रामचंद्र पवार (उद्योग), प्रसाद पाटील (कृषी तंत्रज्ञान), गणेश खरात (शैक्षणिक क्षेत्र) यांचा राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार 2025 प्रदान करून गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेचे हितचिंतक प्रवीण शेट्टी, प्रकाश जगताप, सुनील शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. गुरूबाबा औसेकर महाराज यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्मरणिकेचे संपादक दिनेश सास्तुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यंकटराव गायकवाड पुढे म्हणाले, मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा अवघी अडीच हजार एकर जमीन सिंचनाखाली होती. अतिमागासलेपणाचे हे उदाहरण होते. हे चित्र बदलण्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या उद्योगाची, एक शाखा आपल्या गावात सुरू केली पाहिजे, समाजाला ते उपकारक ठरेल.
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून मराठवाड्यात 6 वर्षे काम केले आहे. मराठवाड्याच्या विकासाची संधी आत्ताच आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर विकास शक्य आहे.
ह. भ. प. औसेकर महाराज म्हणाले,‘मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीला ज्ञान, कला, कौशल्याचा मोठा वारसा आहे. केवळ मराठवाड्याचा विकास अशी दृष्टी न ठेवता, भारतमातेचा विकास, हा विचार ठेवला पाहिजे. अध्यात्माला सामाजिक आयाम दिला पाहिजे. कुठेही गेलात तरी आपली जन्मभूमी विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी देविदास पाठक, दिनकरराव मोरे, नारायण महाराज पालमकर आणि डॉ. रमण गंगाखेडकर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
स्वत:मधील न्यूनगंड काढून टाका, ध्येय निश्चित ठेवा आणि आपल्या कामाचा देशासाठी उपयोग कसा होईल, याचा विचार करा. फक्त आपल्यापुरते पाहू नका, असा सल्ला डॉ. गंगाखेडकर यांनी दिला. पं. अजय पोहनकर यांनी ‘गोविंद जय जय, गोपाल जय जय’ या रचनेची झलक ऐकवली.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात धनंजय जोशी आणि सहकाऱ्यांनी भक्तिनाट्यरंग हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले.