स्वरमयी गुरुकुल आयोजित मैफल
पंडित सुदिप चट्टोपाध्याय यांचे बासरीवादन तर मधुमिता चट्टोपाध्याय यांचे गायन
Team My Pune City –उपशास्त्रीय गायन व बासरी वादनाची (Pune)कलात्मक मैफल आज रसिकांनी अनुभवली. बनारस घराण्याची ओळख दर्शविणारी ठुमरी, दादरा, कजरी, झुला यांच्यासह पंडित पन्नालाल घोष यांच्या घराण्याचे प्रतिनिधीत्व करणारे गायकी अंगाने खुलत जाणारे बासरीवादन हे मैफलीचे वैशिष्ट्य ठरले.
निमित्त होते डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुल आयोजित मासिक स्वरमयी बैठकीअंतर्गत बासरीवादन आणि गायनाच्या जुगलबंदीचे! पंडित सुदिप चट्टोपाध्याय यांनी बासरी वादनाच्या मैफलीची सुरुवात राग ललतमधील विलंबित एकताल तसेच मध्यलय त्रिताल सादर करून केली. यात वाजविलेली दोन मध्यमांची चिज लक्षणीय ठरली. त्यानंतर चट्टोपाध्याय यांनी सूरदासी मल्हार रागातील एक पारंपरिक बंदिश सादर केली. वृंदानवी सारंग या नावानेही ओळखला जाणारा हा राग सारंग व मल्हार या दोन रागांचे अनोखे मिश्रण दर्शविणारा होता. गायन-वादन क्षेत्रातील अनेक रसिक आणि कलाकारांनी पंडित चट्टोपाध्याय यांच्या वादनाला भरभरून दाद दिली.
यानंतर मधुमिता चट्टोपाध्याय यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात आपल्या गुरू पौर्णिमा चौधरी यांनी शिकविलेल्या ‘साची कहो मोसे बतिया कहां गुजारी सारी रतिया’ या बनारसी घराण्याच्या पारंपरिक ठुमरीने केली. शब्दप्रधान गायकी दर्शविणाऱ्या उपशास्त्रीय गायनाच्या मैफलीत यानंतर मधुमिता चट्टोपाध्याय यांनी ‘पिराई मोरी अखिया राजा हमसे बोलो’ हा पारंपरिक दादरा सादर केला.
Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे
Nigdi: निगडी प्राधिकरण येथे सशस्त्र दरोडा
मैफलीच्या उत्तरार्धात पंडित सुदिप चट्टोपाध्याय आणि मधुमिता चट्टोपाध्याय यांच्या बासरी व गायनाची जुगलबंदी रंगली. ‘तुम साची कहो रैना’ ही पारंपरिक बंदिश तसेच राग पिलूमधील ‘घिरी आयी है कारी बदरिया, राधे बिना लागे ना मोरा जिया’ ही कृष्णाला झालेला राधेचा विरह दर्शविशरी कजरी सादर केली. ‘झमक झुकी आयी बदरिया कारी, झुला झुले नंदकिशोर’ हा पारंपरिक झुला बासरीवादन व गायन यातून सादर झाला तेव्हा जणू कृष्ण-राधेच्या क्रीडांचे मनोहारी दृश्य रसिकांसमोर साकारले गेले. जुगलबंदीची सांगता ‘चलारे परदेसिया नैना लगायीके’ या भैरवीने झाली.
खुल्या आवाजातील गायन आणि गायकी अंगाने सादर केलेले बासरीवादन रसिकांच्या मनात गुंजत राहिले. या जुगलबंदीतून परस्परपूरक कलात्मक, सृजनशील संवाद रसिकांना अनुभवायला मिळाला. कलाकारांना किशोर कोरडे (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी) यांनी समर्पक साथ करत मैफलीची रंगत वाढविली. कलाकारांचा सत्कार डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या मानद विश्र्वस्त डॉ. भारती एम. डी., डॉ. अश्विनी वळसंगकर यांनी केला तर सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी-घोडके यांनी केले.